नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मालेगाव शहरातील महामार्गावरील लब्बैक हॉटेलजवळ मध्यरात्री पवारवाडी पोलिसांनी छापा टाकून दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघा सराईत गुन्हेगारांना अटक केली. अंधाराचा फायदा घेवून दोन संशयित फरार झाले.
संशयितांच्या ताब्यातून पोलिसांनी दोन गावठी पिस्तुल (कट्टे), सहा जिवंत काडतूस, तलवार असा ऐवज जप्त केला. संशयितांना न्यायालयात हजर केले असता १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत मिळाली.
अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, पवारवाडीचे पोलिस निरीक्षक सुजीत पाटील व सहकारी गस्तीवर असताना त्यांच्या पथकास दरोड्या संदर्भात माहिती मिळाली.
श्री. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून लब्बैक हॉटेल परिसरात छापा टाकला असता त्यांना दरोड्याच्या तयारीत असलेल्या रब्बानी शेख कादीर, जहीर शेख हारुण व जलाल मोहम्मद हनीफ मिळून आले.
पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांना रब्बानी व जहीर यांच्याकडून प्रत्येकी एक गावठी पिस्तुल व सहा जिवंत काडतूस तसेच तलवार मिळून आली.यावेळी अंधाराचा फायदा घेत संधी साधून शाहीद अख्तर शकील अहमद व मोहम्मद रजा रईस अहमद उर्फ शेरा हे दोन संशयित फरार झाले. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
संशयितांविरुद्ध पवारवाडी पोलिस ठाण्यात दरोड्याची तयारी व शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचही संशयित सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध यापुर्वी विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत.
सोमवारी (ता. ९) दुपारी अटक केलेल्या तिघा संशयितांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने तिघा संशयितांना १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.