नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे शेतकरी कृतज्ञता मेळावा पार पडला होता.
त्यावेळी बोलतांना अजित पवार यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक बोलावून सप्तशृंगी देवी संस्थानच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी देण्यात येईल, असे म्हटले होते.
त्यानुसार आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत सप्तशृंगी देवी संस्थानच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला ८१ कोटी ८६ लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.
यावेळी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या तीर्थक्षेत्र विकासासाठी ८१.८६ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. हा सुधारित आराखडा २५ कोटींपेक्षा अधिक असल्याने तो ग्रामविकास विभागाकडून नियोजन विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सुधारीत आराखड्यात स्वच्छतागृह बांधणे, डोम बसविणे, दरड कोसळण्यापासून संरक्षणात्मक जाळी बसविणे आदी विविध कामांचा समावेश आहे.
दरम्यान, अजित पवारांनी कळवण येथील मेळाव्यात बोललेला शब्द अवघ्या दोनच दिवसांत पूर्ण करून दाखविल्याने सर्वत्र अजित पवारांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. तसेच कळवण-सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांच्यासह ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.