शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा इशारा
नाशिक (प्रतिनिधी): प्रभाग क्रमांक २४ मधील विविध भागात काही दिवसांपासून कमी दाबाचा आणि दुषित पाणी पुरवठा होत आहे. वेळोवेळी तक्रारी करूनही संबंधित अधिकार्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. पुरेसा, सुरळीत व स्वच्छ पाणी पुरवठा न झाल्यास हंडे व पाण्याचे भांडे घेवून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने दिला आहे. याबाबत शुक्रवारी, ६ ऑक्टोबर रोजी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
गोविंदनगर, सद्गुरूनगर, कालिका पार्क, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, औदुंबर वाटिका परिसर, प्रियंका पार्क, जगतापनगर, खोडे मळा आदी भागात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने, अपुरा पाणी पुरवठा होत आहे. रहिवाशांना विकतच्या टँकरचे, तसेच बोअरचे पाणी वापरावे लागत आहे. काही भागात दुषित पाणी पुरवठा होत आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईन सतत फुटते, पण कायमची दुरुस्ती केली जात नाही.
बाजीरावनगरच्या काही भागात गेल्या तीन वर्षांपासून कमी पाणी पुरवठा होतो. याबाबत संबंधित पाणी पुरवठा अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या. तुमच्याकडे लोड जास्त आहे, नळ कनेक्शन वाढवा.
पाणी मीटर खराब झाले असेल, पाणी किती फोर्सने येते हे जावू द्या, पण ते किती लिटर येते हे तपासावे लागेल. कनेक्शन बदला, अशी कारणे सांगून रहिवाशांनाच वेठीस धरले जाते. समस्या सोडविण्याऐवजी नागरिकांवर दबाव तंत्राचा वापर केला जातो, या कृतीचा या निवेदनातून निषेध करण्यात आला आहे. पुरेसा, सुरळीत व स्वच्छ पाणी पुरवठा न झाल्यास रहिवाशी रस्त्यावर उतरतील.
हंडे व पाणी भरण्याचे भांडे घेवून आंदोलन करतील, असा इशारा सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, विनोद पोळ, निलेश ठाकूर, विठ्ठलराव देवरे, दिलीप निकम, बापूराव पाटील, बाळासाहेब देशमुख, डॉ. शशीकांत मोरे, उज्ज्वला सोनजे, भारती देशमुख, मीना टकले, वंदना पाटील, अशोक पाटील, अनंत संगमनेरकर, बाळासाहेब राऊतराय, मनोज पाटील, मनोज वाणी, दीपक दुट्टे, सचिन राणे, सतीश मणिआर, शैलेश महाजन, मगन तलवार, राहुल काळे, पुरुषोत्तम शिरोडे, तेजस अमृतकर, हरिष काळे, प्रथमेश पाटील आदींनी दिला आहे. पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर यांनाही हे निवेदन देण्यात आले आहे.