नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): चार दिवसांपूर्वी पुणे येथील ससून रुग्णालयातून ड्रग्ज माफिया ललित पाटील हा फरार झाला होता. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी नाशिकरोड भागातील शिंदेगाव येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या ड्रग्जच्या कारखान्यावर धाड टाकून कोट्यवधी रुपयांचे एमडी जप्त केले होते. सदरचा कारखाना चालविणारा ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील हा फरार झाला आहे.
त्यानंतर ही घटना घडल्यावर काल म्हणजेच शनिवारी पुन्हा शिंदेगाव परिसरात असलेल्या एका ठिकाणी नाशिकरोड पोलीसांनी छापा टाकून त्या ठिकाणी असलेल्या ड्रग्ज बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या गोडाऊनवरून सुमारे ६ कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला. यानंतर आज पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी या घटनेप्रकरणी पत्रकार परिषद घेत ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित आरोपींचे पाळेमुळे खोदून काढू व त्यांना कठोर शिक्षा करू अशी ग्वाही दिली.
याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त मोनिका राऊत म्हणाल्या की, शिंदेगाव परिसरातील दत्तू वामन जाधव (रा. जुना ओढा रोड, कर्जुल मळा, नाशिकरोड) यांनी पोलिसांना माहिती दिली की संजय काळे नावाच्या इसमाला शेतीसाठी लागणारी औषधे कच्चामाल ठेवण्यासाठी दरमहा पाच हजार रुपये प्रमाणे भाडे तत्वावर जागा दिली होती. परंतु,सध्या तो गाळा बंद असून याबाबत शंका निर्माण झाली, अशी माहिती पोलिसांना दिली.
त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत हड, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, सुवर्णा हंडोरे आदींनी शिंदे गाव एमआयडीसी ठिकाणी फॉरेस्टिक टीमसह छापा टाकला असता त्याठिकाणी ४८७० किलोग्रॅम वजनाचा पाच कोटी ८४ लाख ४० हजार रुपये किंमतीचा पिवळसर रंगाचा पावडर स्वरूपाचा असलेला एमडी नावाचा अमली पदार्थ व १२ हजार रुपये प्रति ग्रॅम वजनाचा पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मिळून आला.तसेच सदर गोडाऊनमधून एमडी तयार करण्याचे केमिकल व इतर साधनसामुग्री असा सुमारे पाच कोटी ९४ लाख ६० हजार ३०० रुपयांचा माल जप्त करण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, सदर घटनेमध्ये तीन आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा शोध सुरू आहे. तसेच या ड्रग्जच्या रॅकेटची पाळीमुळे खोदून काढू व आरोपींना कठोर शिक्षा करू असेही राऊत यांनी सांगितले. या पत्रकार परिषदे प्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, सुवर्णा हंडोरे आधी उपस्थित होते. तसेच सदरच्या कामगिरीत पोलीस हवालदार शेख, कोळी, पवार, पानसरे, कासार, जाधव, नागरे गाडेकर, शिंदे, पिंगळे यांनी सहभाग घेऊन यशस्वीपणे राबविली.