नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): श्री सप्तशृंगी मातेचे मंदिरात नवरात्रोत्सवात भाविकांना २४ तास दर्शन खुले राहणार आहे. १५ ते २४ ऑक्टोबरपर्यंत नवरात्रोत्सव असून या काळात सप्तशृंगीदेवी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय शासकीय अधिकारी, सप्तशृंग निवासिनी ट्रस्ट विश्वस्त, व्यवस्थापक ग्रामपंचायत यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
भाविकांना श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंग निवासिनी देवीचा नवरात्रोत्सव अतिशय आनंदात व भक्तिमय वातावरणात होत असतो.
गेल्यावेळेस पहिल्याच दिवशी ६० हजार भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले होते. तर ९ ते १० हजार भाविकांनी प्रसादालयात मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला होता.
यावेळेस भाविक भक्तांच्या सेवा-सुविधेसाठी २४ तास मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे. गेल्या वेळेस सप्तशृंगगड परिसरात भाविकांची कुठल्याही पद्धतीने गैरसोय व चुकाचूक होवू नये त्या दृष्टीने उदभोदन कक्षाची स्थापना करण्यात आली होती.
त्याचप्रमाणे २५६ कॅमेरे सीसीटीव्ही कार्यरत असून एकूण १७० सुरक्षारक्षक, आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेतील स्वयंसेवक तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे १० व ३ बंदूकधारी सुरक्षारक्षक व महाराष्ट्र राज्य पोलीस, राज्य गृहरक्षक दल, कर्मचारी व अधिकारी वर्ग लक्ष ठेवून होते. आपत्तीसाठी २४ तास अग्निबंब सुविधा व प्रथोमपचार केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले होते. यावेळेसही याहून अधिक सोयी भाविकांसाठी केल्या जाणार आहे.
नवरात्रोत्सव काळात दररोज ४० ते ५० हजार भाविक दर्शनासाठी हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दर्शनासाठी येणाऱ्या पायी पालख्या, भाविक यामुळे गडावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सप्तशृंगी देवी मंदिर हे २४ तास भाविकांना दर्शनासाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. नवरात्रोत्सव काळात खाजगी वाहनांना गडावर बंदी असणार आहे. नांदुरीगड पायथ्याशी येथे बसस्थानक व वाहनतळ उभारण्यात येणार आहे.