नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहरात डीजे आणि लेझर शोच्या गजरात उत्साही युवांनी नाचत, थिरकत गणपती बाप्पाला निरोप दिला. मात्र, दुसऱ्या दिवसापासूनच शहरातील अनेक नेत्रतज्ज्ञांकडे नेत्ररुग्ण वाढू लागले.
विशीतले तरुण अचानक वाढल्याने प्राथमिक तपासणी करून पाहिले तर त्यांची नजर खूपच कमी झाल्याचे दिसून आले. नेत्रपटलावर खूप रक्त साचून भाजल्यासारख्या जखमा आढळल्याच्या अनेक घटना नेत्ररोग तज्ज्ञांच्या निदर्शनास आल्या आहेत.
फेर हिस्ट्री तपासणीत त्याला विचारले की काही मार लागला होता का? किंवा तू काही ग्रहण बघितले. तू का? की कुठे वेल्डिंग बघितले? तर त्यातील काहीच पॉझिटिव्ह नव्हते. खोलवर विचार केल्यावर त्याने सांगितले की काल मिरवणुकीत नाचत डीजेवर लेझर शो बघितला. लेझर शोचा लेझर बर्न रेटिनावर असल्याचे बहुतांश घटनांमध्ये निदान झाले. नेत्ररोग संघटनेच्या माध्यमातून विचारपूस केली असता अजून काही अन्य नेत्र हॉस्पिटलला असेच रुग्ण असल्याचे निदर्शनास आले.
याबाबत नाशिक नेत्ररोग तज्ञ असोसिएशनने पत्रक जारी केलं आहे. ते पुढीलप्रमाणे::
गेल्या तीन चार दिवसांमध्ये अचानकपणे दृष्टी कमी झाल्याचे सहा ते सात रुग्ण आपल्या नाशिक शहरात आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांचे वय हे २० ते ३० वर्ष आहे. सदर रुग्णांना डोळ्यांना बाह्य स्वरूपात इजा किंवा तक्रारी नव्हत्या; मात्र दृष्टी गंभीर स्वरूपात कमी झालेली आढळली.
सखोल नेत्र तपासणी अंतर्गत असे निदर्शनास आले कि, त्यांच्या दृष्टी पटलावरील केंद्रबिंदूवर रक्तस्त्राव व भाजल्यासारख्या जखमा होत्या. या सर्व रुग्णांमध्ये या संदर्भात सखोल माहिती तसेच हिस्ट्री घेतल्यानंतर लक्षात आलं कि, या सर्व रुग्णांचा उत्सवात वापरल्या जाणाऱ्या लेझर लाईट बीम सोबत थेट संपर्क आला होता.
या सगळ्या गोष्टींची कारण मीमांसा करतांना निदर्शनास आले की, कोणत्याही कार्यक्रमात वापरले जाणारे लेझर किरणे जर अप्रमाणित/मानांकित किंवा असुरक्षित असतील किंवा त्यांच्या संपर्काचा कालावधी मर्यादेच्या पलीकडे असेल तर त्यापासून नेत्रपटलावर गंभीर स्वरूपाचे परिणाम होऊ शकतात. आणि दृष्टीस कायमस्वरूपी इजा होऊ शकते. त्यामुळे नाशिक नेत्ररोगतज्ञ् संघटनेने जनहितार्थ आवाहन केले आहे की, कुठल्याही प्रकारचा लेझरचा अतिरेक अथवा अविवेकी वापर टाळावा. आणि गरज पडल्यास नेत्र तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.