नाशिक (प्रतिनिधी): अनंत चतुर्दशी अर्थात गुरुवारी (दि. २८) होणाऱ्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सकाळी ११ वाजताच वाकडी बारव येथून प्रारंभ करण्यात येणार असल्याचा निर्णय भद्रकाली पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
जी मंडळे ११ वाजता मिरवणुकीसाठी तयार असणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई देखील होणार आहे. विसर्जन मार्गावर ७० सीसीटीव्हींसह ४ ड्रोनच्या सहाय्याने वॉच ठेवला जाणार आहे. दरम्यान, मिरवणुकीत गणेश मंडळांचे क्रमांक ठरविण्यावरून वाद निर्माण झालेला असताना अखेरीस गेल्या वर्षीप्रमाणेच मंडळांचे क्रम कायम ठेवण्यांवर एकमत झाल्याने वाद मिटला.
मिरवणुकीच्या नियोजनाच्या दृष्टीने मंगळवारी (दि २६) भद्रकाली पोलिस ठाण्यात मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, विनायक पांडे, गजानन शेलार आदींसह गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या वर्षी मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश मंडळांनी एकाच चौकात कित्येक वेळ घालविल्याने अन्य मंडळांना त्याचा फटका बसला होता. यामुळे या बैठकीत आक्रमक झालेल्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी चिठ्ठीद्वारे मिरवणुकीत सहभागी मंडळाचे क्रमांक ठरविण्याची मागणी केल्याने वाद निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी समजूत काढत गेल्या वर्षीप्रमाणेच गणेश मंडळांचा क्रम ठेवण्यात आला. नियमांचे पालन तसेच वेळेचे बंधन पाळण्याबाबतचे हमीपत्र मंडळांकडून पोलिस भरून घेत आहेत. १० पदाधिकाऱ्यांचे आधारकार्ड देखील जोडण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.
बैठकीतले निर्णय असे:
या बैठकीत २०२२ मधील २१ क्रमांकांची यादी सवार्नुमते मंजूर करण्यात आली. सकाळी दहाला मंडळे जमतील, अकराला मिरवणुकीस होणार प्रारंभ होईल. क्रमात असलेल्या मंडळाने दिरंगाई केल्यास मागील मंडळ पुढे जाईल. मुख्य चौकांत मंडळे फक्त १५-२० मिनिटे थांबतील. गुलाल, डीजेचा वापर होणार नाही, ध्वनी मर्यादेचे पालन होईल. ढोल पथकांमध्ये वादक संख्या मर्यादित असेल. अंतर पडलेल्या मंडळांवर उत्सवानंतर कारवाई केली जाईल. रात्री १२ वाजता मिरवणूक संपन्न होईल. फक्त गणेशमूर्ती विसर्जनस्थळी नेण्यात येतील.
मंडळांचा क्रम असा:
१) महानगरपालिका मंडळ, २) रविवार कारंजा ३) गुलालवाडी व्यायामशाळा, ४) भद्रकाली कारंजा, ५) श्रीमान सत्यवादी मंडळ, ६) सूर्यप्रकाश नवप्रकाश मंडळाचा नाशिकचा राजा, ७) सरदार चौक मंडळ, ८) रोकडोबा मंडळ, ९) शिवसेवा मित्रमंडळ, १०) शिवमुद्रा मंडळाचा मानाचा राजा, ११) युवक मित्रमंडळ, १२ ) दंडे हनुमान मित्रमंडळ, १३) युनायटेड फ्रेण्ड सर्कल, १४) शनैश्वर युवक समिती, १५) नेहरू चौक मंडळ, १६) वेलकम सहकार्य मित्रमंडळ, १७) श्री गणेश मूकबधिर मित्रमंडळ, १८) युवासंघर्ष प्रतिष्ठान, १९) गजानन मित्रमंडळ, २०) महालक्ष्मी चाळ सोशल फाउंडेशन, २१) उत्कर्ष मित्रमंडळ
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790