नाशिक (प्रतिनिधी): मुलीच्या नावाने इन्स्टाग्रामवर अकाउंट चालविणाऱ्याशी मैत्री करीत वेळोवेळी पैसे देणे नाशिकच्या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. मुलीच्या आवाजात तरुणाशी फोनवरून संवाद साधण्यासह मुलीच्या भावाच्या नात्याने प्रत्यक्ष भेट घेत संशयिताने दोन लाख रुपयांचा गंडा घातला आहे. गंभीर म्हणजे, महाराष्ट्रात हा सायबर गुन्हा घडला असून, म्हसरूळ पोलिसांनी संशयिताची ओळख पटविली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मखमलाबाद परिसरातील अमोल याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरून म्हसरूळ पोलिसांनी अर्जून तात्याराव उफाडे (रा. मरगळवाडी, गंगाखेड, परभणी) याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अमोल यांनी सन २०२० मध्ये इन्स्टाग्रामवर ईश्वरी मुंढे या नावाच्या अकाउंटला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. मुलीच्या नावाने असलेल्या अकाउंटवरून होणाऱ्या चॅटिंगमध्ये अमोल अधिकच गुंतला. त्यातून एकमेकांची मैत्री आणि गप्पा वाढत गेल्या. ईश्वरी नावाने संवाद साधणाऱ्या व्यक्तीने एक मोबाइल क्रमांक देत त्यावरून मुलीच्या आवाजात अनेकदा अमोलसोबत फोनवर बोलणे केले. वेळोवेळी काही कारणातून पैसे घेतले.
यासह एकावेळी वडिलांच्या आजारपणाचे कारण पुढे करीत १ लाख ९६ हजार रुपयांची मागणी केली. हे पैसे स्वीकारण्यासाठी ईश्वरीचा भाऊ या नात्याने विकास मुंढे नाव धारण करून एक संशयित अमोल यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी आला. त्याने दोन लाख रुपये स्विकारून गावी पोबारा केला. यानंतरही काही दिवस चॅटिंग सुरूच राहिली. मात्र, पैसे परत मागितल्यावर शिवीगाळ आणि दमदाटी सुरू झाल्याने फसवणूक झाल्याचे अमोल यांच्या लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी दाखल केलेल्या तक्रार अर्जावरून तपास पूर्ण करीत म्हसरूळ पोलिसांनी संशयित उफाडेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संशयिताने इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करून मुलीच्या नावाने फिर्यादीला मैत्रीच्या जाळ्यात ओढले. गप्पा वाढल्यावर वडिलांच्या आजारपणाच्या बहाण्याने स्वतःचं नाव बदलून पेठरोडवरील एका हॉटेलात आला. तिथे मुलीचा भाऊ असल्याची बतावणी करून ई-स्वरुपात पैसे घेतले. या मोबाइल क्रमांकावरून म्हसरूळ पोलिसांनी संशयित उफाडे याचा माग काढला. तेव्हा परभणीमधून हा सायबर गुन्हा झाल्याचे उघड झाले. दरम्यान, प्रत्यक्ष ओळख नसलेल्या व्यक्तींशी आर्थिक व्यवहार न करण्याचे आवाहन नाशिक पोलिसांनी केले आहे.