नाशिक (प्रतिनिधी): नाशिक येथील विजयममता चित्रपटगृहाजवळील स्वीटमार्ट व्यवसायिक नाशिकमध्ये इतर स्वीटमार्ट दुकानदारांना भेसळयुक्त मावा पुरविण्यासाठी गुजरात येथून आणत असल्याची गुप्त माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी दिंडोरी तालुक्यातील उमराळे बु. येथे सापळा रचून दोन लाख सत्तावीस हजार किमंतीचा भेसळयुक्त स्वीट मावा जप्त करत गणेशोत्सव काळात धडाडीची कामगिरी केली आहे…
नाशिक जिल्ह्यात गणेशोत्सवात लागणार्या मिठाईसाठी भेसळयुक्त मावा हा गुजरात राज्यातून एका पीकअप वाहनातून येत असल्याची गुप्त माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाली.
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम नाठे, दिपक अहिरे, विनोद टिळे, गिरीष बागूल, अनुपम जाधव यांनी काल रात्री दोन वाजेच्या सुमारास पेठ-नाशिक महामार्गावर गुजरात राज्यातून नाशिक शहरात मिठाई बनविण्यासाठी लागणारा भेसळयुक्त मावा पदार्थ दिंडोरी तालुक्यातील उमराळे बु. येथे पिकअप वाहन क्रमांक (एमएच 15 एचएच 0021) या वाहनात सुमारे 50 गोण्या, प्रत्येकी 30 किलो वजन, एकूण दीड टन असा असून दोन लाख सत्तावीस हजार किमंतीचा भेसळयुक्त स्वीट मावा आढळून आला.
यावेळी सदरचा संशयित भेसळयुक्त मावा हा नाशिक शहरातील स्वीटमार्ट व्यावसायिक तुळशीराम राजाराम चौधरी रा. विजयममता, नाशिकरोड हा नाशिक शहरातील विविध स्वीटमार्ट दुकानदारांना पुरवठा करीत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली असून पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासन विभाग नाशिक यांना दिंडोरी पोलीस ठाणे येथे बोलावून पुढील कारवाईसाठी ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणामुळे स्वीटमार्ट व्यावसायिकांवर संशय व्यक्त केले जात असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.