विवाह झालेल्या महिलेने तिच्यावर ओळखीच्या व्यक्तीने बलात्कार केल्याचा आरोप करत हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. ‘महिला लग्न झालेले असताना दुसऱ्या पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवत होती. त्यामुळे त्या पुरुषाकडून बलात्कार झाला असा आरोप महिला करु शकत नाही. विवाहबाह्य संबंधातील दुष्परिणाम महिलेला माहिती होते’, असं म्हणत झारखंड हायकोर्टाने याचिका फेटाळली आहे.
विवाहित महिलेची फसवणूक करुन व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप झारखंड हायकोर्टाने फेटाळला आहे. महिलेने आरोप केला होता की, आरोपीने खोटे आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केला होता. कोर्टाने असं म्हणत याचिका फेटाळली की, ‘महिलेची दिशाभूल करुन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला असं म्हणता येणार नाही.’ ‘लाईव्ह लॉ’ने यासंदर्भातील बातमी दिली आहे.
न्यायमूर्ती चंद म्हणाले की, ‘महिलेचे २०१८ मध्ये लग्न झाले होते. कायदेशीररीत्या विवाहबंध न संपवता महिलेने आरोपी अभिषेक कुमार याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. महिला आरोपी अभिषेक कुमारपेक्षा मोठी आहे. महिलेला विवाहबाह्य संबंधाच्या परिणामांची पूर्ण जाणीव होती. लग्न झालेलं असताना तिने हे पाऊल उचललं होतं.’
आरोपीने खोटे आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केला असं महिला म्हणू शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं. महिलेने आरोप केला होता की, आरोपीने तिच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिच्याशी लग्नाचे आश्वासन दिले. घरच्यांना याची कल्पना देऊ नकोस असा दबाव आरोपीने टाकला. त्यानंतर आरोपी दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी गेला आणि तेथेच त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केले.
आरोप असा आहे की, आरोपीने लग्न झालेले असताना महिलेशी संबंध ठेवले. महिलेने २०१९ मध्ये आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर २०२० मध्ये ते लग्न करणार होते. पण, कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लादण्यात आला. त्यामुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. महिलेचा आरोप आहे की, यादरम्यान आरोपीने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले.महिलेने यानंतर आरोपीच्या कुटुंबाला या संबंधांची कल्पना दिली होती.