नाशिक जिल्ह्यातील ३६ लाख नागरिकांना ‘आनंदाचा शिधा’ चा लाभ – छगन भुजबळ

नाशिक (प्रतिनिधी): गौरी गणपती सणानिमित्त आगामी दोन दिवसात राज्यातील सर्व लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ चे वाटप पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांना याचा लाभ होणार असल्याने यामुळे लाखो गरीब कुटुंबांचा गणेशोत्सव गोड होणार असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

आज मातोश्री रमाबाई आंबेडकर सभागृह, आंबेडकर नगर येथे आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रा.  देवयानी फरांदे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश निसाळ, तहसीलदार कैलास पवार यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गौरी गणपतीनिमित्त सप्टेंबरमध्ये नाशिक जिल्ह्यातील दोन हजार ६०९ दुकानांमार्फत साधारण ७ लाख ७८ हजार शिधा संच वाटप होणार असून त्याचा लाभ ३६ लक्ष लाभार्थ्यांना मिळणार आहे. गौरी गणपतीसह दिवाळीसाठी पात्र शिधापत्रिका धारकांना १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’ मिळणार आहे.

नाशिक शहरात २२९ दुकानांमार्फत ९७ हजार ६१६ शिधा वाटप संचाचे वितरण सुरू असून त्या माध्यामतून साधारण ४ लाख लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. आनंदाच्या शिधा वाटपात एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता अधिकारी व रेशन दुकानदारांनी घ्यावी. त्याचप्रमाणे या आनंदाच्या शिध्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन ही मंत्री भुजबळ यांनी यावेळी केले.

त्याचबरोबर सर्वप्रथम श्रीलंकेत वृक्षारोपण झालेल्या बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण 24 ऑक्टोबर रोजी नाशिक मध्ये करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री भुजबळ यांनी यावेळी दिली.

यावेळी आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या की, शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा चा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळत असून गणपतीच्या अगोदरच सर्व नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप होत आहे. त्यामुळे राज्यातील गोर गरीब जनतेच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी केले. यावेळी महिलांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790