हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार (IMD) आजपासून राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नाशिक (प्रतिनिधी): राज्याच्या बहुतांश भागात पावसानं (Rain) दडी मारली आहे. काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मात्र, शेतकऱ्यांना (Farmers) सध्या चांगल्या पावसाची गरज आहे. कारण खरीपाची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार (IMD) आजपासून राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट:
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मात्र, बहुतांश भागात अद्याप म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. आज राज्यातील काही भागात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईसह कोकणातही पावसाची शक्यता:
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार उद्यापर्यंत म्हणजे 14 सप्टेंबरपर्यंत मुंबईसह (Mumbai) संपूर्ण कोकणातही जोरदार पावसाची शक्यता आहे. तर नाशिक ते कोल्हापूर पर्यंतच्या पाच जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. बंगालच्या उपसागरात लागोपाठ दोन वेळा नवीन चक्रीय वाऱ्याच्या प्रणाली अस्तित्वात येऊ शकते. त्यातून कदाचित दोन्ही वेळा त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होवू शकते. त्यामुळं पावसाची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले.
राज्यातील 453 महसूल मंडळांमध्ये पावसाचा 21 दिवसांपेक्षा अधिकचा खंड:
यंदा मान्सून उशिरा (monsoon 2023) दाखल झाला आणि जून महिना कोरडा गेला. त्यात जुलै महिन्यात थोडाफार पाऊस झाल्यानं पिकांना जीवनदान मिळालं होतं. मात्र, ऑगस्ट महिना देखील कोरडा गेला. त्यामुळं पावसाचा मोठा खंड पडला आहे. राज्यातील 453 महसूल मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिकचा खंड, तर 613 महसूल मंडळांमध्ये 15 ते 21 दिवसांपासून पाऊसच पडला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या भागात पिकांची बिकट परीस्थिती असल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवसांत जर पाऊस झाला नाही तर ही पिकं पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न:
राज्यात चांगला पाऊस नसल्याने अनेक प्रकल्प कोरडे पडले आहेत. ग्रामीण भागातील पाझर तलावातील पाणी देखील आटले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. पिकं तर अक्षरशः करपून गेली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने प्रकल्पातील पाणीसाठा देखील चिंता वाढवणारा ठरत आहे.
आत्तापर्यंत 141.09 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी:
खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र 142 लाख हेक्टर असून आतापर्यंत प्रत्यक्षात 141.09 लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 99 टक्के पेरणी झाली आहे. राज्यात पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत राज्यात सोयाबीन पिकाची 50.72 लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस पिकाची 42.30 लाख हेक्टर, तूर पिकाची 11.15 लाख हेक्टर, मका पिकाची 9.11 लाख हेक्टर, तसेच भात पिकाची 15.28 लाख हेक्टरवर पुनर्लागवड झाली आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790