नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातील नांदगाव येथील जामदरी शिवारात राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात बस मधील १५ शाळकरी विद्यार्थी आणि प्रवासी जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बस क्रमांक एमएच.१४ बीटी ३८०६ ही गिरणा डॅमकडून नांदगावकडे येत असताना सदर बस जामदरी फाट्याजवळ आली असता बसचे पाटे तुटल्याने हा अपघात झाला.
या बसमध्ये अंदाजे ५० ते ५५ प्रवाशी होते. त्यामध्ये शाळकरी मुले आणि इतर प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. या बसमधील सर्व शाळकरी मुले चाकोरी येथील कर्मवीर भाऊसाहेब विद्यालयातील असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या अपघातात शाळकरी मुले आणि प्रवाशांसह चालक शांताराम सोनवणे आणि वाहक योगेश गरुड हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर अपघातस्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790