नाशिक (प्रतिनिधी): शेतातील सामाईक विहिरीतून पाणी भरण्याच्या वादातून काकाचा खून केल्याच्या आरोपावरून राहुल दिलीप गडाख (२४, रा. मांडवड, ता. नांदगाव) याला येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
१० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा व अपर सत्र न्यायाधीश एस. बी. बहाळकर यांनी सोमवारी (ता.४) हा निकाल दिला.
नांदगाव तालुक्यात मांडवड शिवारातील सामाईक विहिरीवर पाणी भरण्याच्या कारणावरून २ सप्टेंबर २०१६ ला राहुल याचे चुलते मधुकर शिवराम गडाख (४५) यांच्याशी वाद झाले.
चुलत्याने शिवीगाळ केल्याने रागाच्या भरात राहुलने जवळ असलेल्या लाकडी दांड्याने चुलते मधुकर गडाख यांच्या पोट, पाठ व डोक्यावर मारहाण केली.
अत्यवस्थ स्थितीतील मधुकर गडाख यांना औरंगाबाद येथे दाखल केले, तेथे उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. मधुकर यांच्या पत्नी आशाबाई मधुकर गडाख यांच्या तक्रारीवरून राहुल गडाख याच्याविरुद्ध नांदगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक एन. जे. महाले यांनी तपास करून न्यायालयात खटला दाखल केला होता. न्यायाधीश बहाळकर यांच्यासमोर नुकतेच या खटल्याचे कामकाज चालले. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अशोक पगारे यांनी दहा साक्षीदार तपासले.
खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याने राहुलला जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. श्री. पगारे यांना या खटल्यात पैरवी अधिकारी पोलिस नाईक केशव सूर्यवंशी यांनी साहाय्य केले.