नाशिक: त्र्यंबकेश्वरला विनादुधाच्या पेढ्यासह खाद्यपदार्थ जप्त; अन्न प्रशासनाची कारवाई

नाशिक (प्रतिनिधी): अन्न व औषध प्रशासनाने तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता दर्जेदार अन्नपदार्थ मिळण्याच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वर येथे तपासणी मोहीम सुरू केलेली आहे.

त्याचाच भाग म्हणून त्र्यंबकेश्वर येथे भीमाशंकर पेढा दुकानाची तपासणी केली असता तेथे गुजरातमधील रिच स्वीट डिलाइट एनलॉग या नावाने उत्पादित अन्नपदार्थाच्या प्रत्येकी दहा किलोच्या आठ बॅग आढळून आल्या.

या अन्नपदार्थाचा उपयोग करून विक्रेता गोसावी पेढा तयार करून त्याची मलाई पेढा नावाने विक्री करीत असल्याचे आढळले. ही मलाई पेढ्यात तसेच रिच स्वीट डिलाइट या अन्नपदार्थात कुठल्याही प्रकारच्या दुधापासून तयार झालेली मलई नसल्याने अन्नसुरक्षा अधिकारी गोपाल कासार यांनी रिच स्वीट डिलाइट या अन्नपदार्थाचा साठा जप्त केला.

पुढील आदेशापर्यंत साठा सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले. विक्रीसाठी तयार केलेला मलाई पेढ्याचा नमुना घेऊन पेढे नाशवंत असल्याने घटनास्थळी साठा नष्ट केला. जप्त केलेला रिच स्वीट डिलाइट अन्नपदार्थांच्या आठ बॅग (किंमत १४ हजार ०४०) तसेच नष्ट केलेला आठ किलो मलई पेढा (३२०० रुपये) याप्रमाणे एकूण १७ हजार २४० रुपयांच्या साठ्याबाबत कारवाई करण्यात आली.

व्यावसायिकाकडे अन्न व्यवसाय करण्यासाठी आवश्यक सुरक्षा मानके कायद्यांतर्गत आवश्यक असलेला परवानाही उपलब्ध नसल्याचे आढळून आले. ही कारवाई अन्नसुरक्षा अधिकारी कासार व प्रमोद पाटील यांनी सहआयुक्त संजय नारागुडे व सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790