मुंबई (प्रतिनिधी): मान्सूनच्या पावसानं ऑगस्ट महिन्यात ब्रेक घेतल्यानंतर सप्टेंबर महिन्यात तरी चांगला पाऊस होणार का याकडे सर्वाच्या नजरा लागलेल्या आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होणार आहे. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये भारतीय हवामान विभागाच्या या अंदाजामुळं आशेचं चित्र निर्माण झालं आहे. सप्टेंबरच्या पंधरावड्यात दख्खनचे पठार आणि मध्य भारतात चांगला पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागानं सप्टेंबर महिन्यातील चार आठवड्यांचा पावसाचा अंदाज जाहीर करताना ही माहिती दिली.
पावसाचं कमबॅक होणार:
भारतीय हवामान विभागाकडून आज सप्टेंबर महिन्यातील चार आठवड्यांचा पावसाचा अंदाज जाहीर करण्यात आला. आयएमडीनं सप्टेंबर महिन्यात पावसाचं पुनरागमन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर पर्यंत दख्खनचे पठार आणि मध्य भारतात पावसाचं कमबॅक होईल, असं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, कोकण, गोवा, कर्नाटक, केरळच्या किनारपट्टी भागात पावसाचं आगमन होईल, असं हवामान विभागानं सांगितलं आहे.
मराठवाड्याला दिलासा मिळणार:
ऑगस्ट महिन्यातील पावसानं ब्रेक घेतल्यानं मोठी महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट निर्माण झालेलं आहे. गेल्या शंभरवर्षामध्ये पहिल्यांदा ऑगस्ट महिन्यात कमी पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यापासूनच्या पावसाची तूट ९ टक्क्यांवर पोहोचली आहे. तर, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाअभावी पिकं संकटात आलेली होती. आता मात्र, हवामान विभागानं सप्टेंबरच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये पावसाचं पुनरागमनम महाराष्ट्रात प्रामुख्यानं मराठवाड्यात होईल, असं म्हटल्यानं मराठवाड्याला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यासह कोकणात देखील पावसाचं कमबॅक होईल, असा अंदाज आयएमडीनं वर्तवला आहे.
ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात सरासरीच्या केवळ ४० टक्के पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये जून ते ऑगस्ट महिन्यात ३२-४४ टक्के कमी पाऊस झाला आहे.
राज्यातील धरणांमधील पाणीसाठा देखील गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे. गतवर्षी या दिवसांमध्ये ८३.६० टक्के पाणी धरणांमध्ये होतं. यंदा मात्र ६४.३७ टक्के पाणी साठा असल्याची नोंद झाली आहे. राज्यातील खरीप हंगामातील पेरणीचं क्षेत्र २.७२ लाख हेक्टरनं घटलं आहे.