Breaking: सामान्य नागरिकांना मोठा दिलासा! घरगुती गॅस सिलेंडर 200 रुपये स्वस्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): देशभरातील गृहिणींना मोदी सरकारने राखी पोर्णिमेच्या एक दिवस आधी मोठं गिफ्ट दिलं आहे. उद्यापासून म्हणजे बुधवारपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या 200 रुपयांनी कमी होणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी केली आहे.

यासोबतच ७५ लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येणार असेही जाहीर केले. या निर्णयामुळे महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अलीकडच्या काळात गगनाला भिडलेल्या महागाईमुळे जनतेच्या अडचणी वाढल्या होत्या, मात्र आता सरकारच्या या निर्णयाने सामान्य जनतेला थोडा दिलासा मिळेल.

केंद्राची घोषणा:
३३ कोटी ग्राहकांसाठी २०० रुपयांनी सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. उज्ज्वला योजनेतील ग्राहकांसाठी ४०० रुपयांनी दर कमी करण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं ओनम आणि रक्षाबंधनाच्या निमित्तानं हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर सध्या दिल्लीत ११०३ रुपये, कोलकाता ११२९ रुपये, मुंबईत ११०२ आणि चेन्नईत १११८.५० रुपये आहेत.

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दुहेरी लाभ:
मोदी सरकारच्या या घोषणेनंतर आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) लाभार्थ्यांना २०० रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळेल. उज्जवला योजनेत आधीच अनुदान म्हणून २०० रुपयांचा लाभ दिला जातो. अशा प्रकारे आता त्यांना ४०० रुपये सबसिडी दिली जाईल.

मोदी सरकार 2014 साली ज्यावेळी सत्तेत आलं होतं त्यावेळी 14.5 कोटी लोकांकडे गॅस कनेक्शन होतं. पण आता देशातल्या 33 कोटी लोकांकडे गॅस कनेक्शन असल्याचं अनुराग ठाकुर यांनी सांगितलं.

घरगुती गॅस सिलेंडरची किंमत सध्या 1100 रुपयांच्या वर असून मोदी सरकारच्या या ताज्या निर्णयामुळे बुधवारपासून ती 900 रुपयांपर्यंत कमी होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790