नाशिक (प्रतिनिधी): शालिमार चौकात चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली.
चौकशीमध्ये दोघांपैकी एक संशयित तडीपार गुंड असल्याचे समोर आले आहे.
गणेश श्याम जाधव (२१, रा. म्हसोबावाडी, गंजमाळ), पांडुरंग ऊर्फ पांड्या हनुमंत शिंगाडे (१९, रा. पंचशीलनगर, गंजमाळ), अशी संशयितांची नावे आहेत. पथकाचे विशाल काठे यांना संशयित शालिमार चौकात चोरीचे मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांना माहिती दिल्यानंतर, शालिमार चौकात सापळा रचला.
दोघे संशयित चोरीचे मोबाईल विक्रीसाठी आले असता, दबा धरून असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चोरीचे मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, संशयितांची चौकशी सुरू असताना पांडुरंग शिंगाडे हा भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यास शहर-जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले होते. तरीही तो शहरात साथीदाराच्या मदतीने मोबाईल चोरी करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. शिंगाडे याच्याविरुद्ध यापूर्वी मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत.
सदर कामगिरी वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, रवींद्र बागूल, नाजीम पठाण, विशाल देवरे, विशाल काठे, प्रशांत मरकड, राजेश राठोड, जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख यांनी बजावली.