नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये तीन दिवसांनी कांदा लिलाव सुरु झाला होता. पण, पुन्हा एकदा शेतकऱ्यांकडून लिलाव बंद पाडण्यात आला आहे. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने आणि नाफेडचे अधिकारीही याठिकाणी उपस्थित नसल्याने शेतकरी नाराज आहेत. त्यामुळे शेतकरी आक्रमक होत त्यांनी कांदा लिलाव बंद पाडला आहे. लासलगाव आणि पिंपळगाव येथील बाजारपेठातील कांदा लिलाव बंद पाडण्यात आलाय.
तीन दिवसांनी सुरु झालेला लिलाव आज दोन तासांतच बंद झाला. शेतकऱ्यांना कांद्याला भाव मिळण्याची अपेक्षा होती. पण, त्यांना म्हणावा तसा भाव मिळालेला नाही. नाफेडच्या दरानुसार देखील भाव मिळत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. यावेळी नाफेडचा कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
कांद्याला २४१० रुपये क्विटंल भाव देण्यात आलाय. पण, कांद्यासाठी किलोमागे २० रुपये खर्च होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तीन दिवस लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांनी आज मोठ्या आशेने बाजार गाठला होता. पण, त्यांच्या पदरी निराशा पडल्याची चर्चा आहे. शेतकऱ्यांना म्हणावा तसा भाव मिळाला नाही. संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव आणि पिंपळगाव येथील बाजारपेठातील कांदा लिलाव बंद पाडला आहे.
दरम्यान, नाशिकातील कांदा प्रश्न आता मिटला असं बुधवारी जाहीर करण्यात आलं होतं. मंत्री भारती पवार यांच्या मध्यस्थीनंतर कांदा व्यावसायिकांच्या संघटनने संप मागे घेतला होता. त्यामुळे तीन दिवसांनी पुन्हा एकदा कांदा लिलाव सुरु होईल अशी आशा होती. भारती पवार यांच्यासोबत कांदा व्यायसायिकांच्या संघटनेची बुधवारी बैठक झाली होती. पण, अद्याप हा प्रश्न मार्गी न लागल्याचे चिन्ह आहे.
भारतातील कांदा कुठे कुठे निर्यात होतो?
आशियाई देशांमधील अनेक पारंपरिक पदार्थांमध्ये कांद्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, मलेशिया, संयुक्त अरब अमिराती आणि श्रीलंका या देशांमध्ये भारतीय कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात होतो