नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात काही ठिकाणी शनिवारी (ता. १९) मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे वर्तविण्यात आला आहे.
मात्र, जिल्ह्यात सर्वदूर अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने धरणांतील साठा ६५ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. गेल्या वर्षी याच काळात धरणे ९३ टक्के भरली होती.
गेल्या वर्षी आळंदी, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर ही धरणे १०० टक्के भरली होती. यंदा आतापर्यंत भावली, वालदेवी, हरणबारी, केळझर ही धरणे ‘फुल्ल’ झाली आहेत.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात जलसंपदा विभागाने ९१ टक्के साठा ठेवला आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे धरणसाठा राखण्यावर जलसंपदा विभागाने लक्ष केंद्रीत केले.
सद्यस्थितीत दारणातून ५५०, वालदेवीतून ६५, नांदूरमधमेश्वरमधून १५१, हरणबारीतून १७३, केळझरमधून ७५ क्यूसेस विसर्ग करण्यात येत आहे.
धरणांमधील साठ्याची टक्केवारी अशी : कश्यपी- ५९, गौतमी गोदावरी- ५८, आळंदी- ७५, पालखेड- ४४, करंजवण- ५८, वाघाड- ७३, ओझरखेड- ३७, पुणेगाव- ९२, तिसगाव- ०, दारणा- ९४, मुकणे- ७७, कडवा- ८६, भोजापूर- ६६, चणकापूर- ७८, गिरणा- ३७, पुनंद- ६१.