नाशिक (प्रतिनिधी): येथील ज्योतिर्लिंग मंदिरात गुरुवारपासून (ता. १७) सुरु होत असलेल्या श्रावणानिमित्त मंदिर विश्वस्त मंडळातर्फे भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार श्रावणात दररोज पहाटे पाच ते रात्री नऊपर्यंत, तर श्रावणी सोमवारी पहाटे चार ते रात्री नऊपर्यंत मंदिरात दर्शनाची व्यवस्था असेल.
नीज श्रावण मासारंभासोबत महाराष्ट्र आणि इतर राज्यातील शिवभक्तांची पावले त्र्यंबकेश्वरकडे वळू लागतात. बुधवारपर्यंतच्या (ता. १६) अधिक मासानिमित्त दर्शन, पूजाविधीसाठी देशभरातील भाविकांची गर्दी झाली होती. भाद्रपद मासारंभ १६ सप्टेंबरला होत असून तोपर्यंत शहरामध्ये गर्दी असेल.
भाविकांना पूर्व दरवाजातून, तर देणगी दर्शन रांगेतून उत्तर दरवाजातून प्रवेश दिला जाणार आहे. पूर्व दरवाजातून भाविकांना दर्शनाचा त्रास होऊ नये म्हणून वातानुकूलित दर्शन बारीची व्यवस्था झाली आहे.
दर्शन रांगेत ज्येष्ठांना बसण्याची, स्तनदा मातांना हिरकणी कक्षाची, पिण्याचे शुद्ध पाणी आणि प्राथमिक आरोग्य कक्ष अशा सुविधा असतील.
स्थानिकांना स्थानिक रहिवाशांच्या ओळखपत्राच्या आधारे उत्तर महाद्वारमधून दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. स्थानिक मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यावर सकाळी साडेदहापर्यंत आणि सायंकाळी सहा ते रात्री आठपर्यंत व्यवस्था केली जाणार आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790