नाशिक (प्रतिनिधी): येथील एका जावयाला सासुरवाडीला धोंडा खायला जाणे चांगलेच महागात पडले आहे.
येवला तालुक्यातील पारेगाव रोडवरील बंद असलेले घर फोडून चोरट्यांनी ४० हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
येवला व पारेगावच्या सरहद्दीवर नव्याने बांधकाम झालेल्या घरात राहणारे सुनील तुकाराम पोटे धोंडा खाण्यासाठी सासूरवाडी चांदवड येथे गेले होते.
चोरट्यांनी मंगळवार ते बुधवारच्या मध्यरात्री त्यांच्या बंद घराचा कडीकोंयडा तोडून घरात प्रवेश केला व मौल्यवान साहित्य लंपास केले.
चोरट्यांनी व्हिडिओकॉन कंपनीचा एलईडी टीव्ही, चांदीचे २५ भाराचे पाच देव, चांदीची दहा भाराची महालक्ष्मी देवीची मूर्ती, सहा भाराच्या चांदीच्या पादुका, दोन भाराचा कळस, तसेच २४ हजार रुपयांच्या नोटा व पाचशे रुपयांचे नाणे, असा ३९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
दुसऱ्या दिवशी दूध देण्यासाठी आलेले शिवाजी काळे यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी घरमालकांना फोन करून चोरीबाबत माहिती दिली.
या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी तातडीने घटनस्थळी धाव घेत ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करून गुन्हा नोंदवून चोरीचा तपास सुरू केला आहे.
पोलिस निरीक्षक नंदकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक पगार तपास करीत आहेत.