नाशिक (प्रतिनिधी): शहरात सोमवारी (ता.७) वेगवेगळ्या घटनांमध्ये एका अल्पवयीन मुलासह दोन युवकांनी आत्महत्या केली. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.
राजीवनगर झोपडपट्टीत १६ वर्षीय राहुल माणिक खिल्लारे (रा. मूळ रा. परभणी) याने गळफास घेत आत्महत्या केली. राहुल याने सोमवारी सायंकाळी पाच वाजता अज्ञात कारणातून राहत्या घरात गळफास घेतला. तो एका स्टेशनरी दुकानात काम करून कुटुंबीयांना आर्थिक हातभार लावत होता. आईवडीलही मजुरी करतात. त्याने नुकताच एक मोबाईलही खरेदी केला होता.
शांत व संयमी असलेल्या राहुलने एकाकी हे पाऊल का उचलले, याचा इंदिरानगर पोलिस शोध घेत आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात त्याच्या कुटुंबासह नातलगांनी आक्रोश केला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तर, म्हसरुळ पोलिसांच्या हद्दीतील वैदूवाडी येथे पायाच्या दुर्धर आजारावरील उपचाराला कंटाळून अजय सुभाष कांबळे (२१) याने राहत्या घरात सोमवारी दुपारी गळफास घेत आत्महत्या केली.
त्याच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईड नोट आढळली असून, त्यात पायाच्या आजारावर उपचार केले. पण पाय बरा होत नाही, त्यामुळे वैतागून जीवनयात्रा संपवत असल्याचे लिहिले आहे.
तो मजुरी करूनच उदरनिर्वाह करत होता, अशी माहिती पोलिस हवालदार केशव भोये यांनी दिली. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे, जयभवानी रोड परिसरात राहणाऱ्या आकाश नाना आवारे (२१, रा. सेंट झेविअर स्कूलजवळ, जेतवननगर) याने सोमवारी दुपारी चार वाजता अज्ञात कारणातून गळफास घेतला. याप्रकरणी उपनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790