नाशिक (प्रतिनिधी): आज महात्मा गांधी रोड परिसरात दुकानांसमोरील पार्क केलेल्या वाहनांवर पोलिसांनी दंडात्मक करवाईचा बडगा उगारला. या कारवाई विरोधात येथील व्यापारी वर्गाकडून दुकाने बंद करत निषेध नोंदवण्यात आला…
महात्मा गांधी रोड परिसरात पोलिसांचे पथक दाखल होत पार्क केलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. अचानकपणे पोलिसांनी ही कारवाई केल्यामुळे येथील व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली.
त्यानंतर व्यापारी वर्ग आक्रमक होत त्यांनी पोलिसांच्या कारवाई विरोधात आंदोलन सुरु केले. परिसरातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद करत पोलिसांच्या कारवाईचा निषेध नोंदवला.
दरम्यान, यावेळी महात्मा गांधी रोडवर काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. “कारवाई करण्याआधी पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. आमच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांवर अशा प्रकारे कारवाई होत असेल तर ग्राहक येणार नाहीत. त्यामुळे व्यावसायिकांचे नुकसान होते” अशा भावना व्यावसायिकांनी व्यक्त केल्या आहेत.