नाशिक (प्रतिनिधी): राज्यात विकासाच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी कितीही बाष्कळ खुलासे केले तरी अजूनही दुर्गम भागात रस्त्याविना गरोदर महिलेला आपला जीव गमवावा लागतोय हे खेदजनक म्हणावे लागेल.
इगतपुरी तालुक्यातील अत्यंत दुर्गम भाग असलेल्या जुनावणेवस्ती वरील हृदयाद्रावक घटना घडली आहे. येथील वनिता भावडू भगत ( वय २३ ) हिच्या गरोदरपणात पोट दुखायला लागल्याने कुटुंबियांनी तिला रुग्णालयात भर्ती करण्यासाठी वस्तीला रस्ताच नसल्याने डोली करून साडे तीन किलोमीटर अंतर पायपिट करणाऱ्या कुटुंबाची ससेहोलपट पाहायला मिळाली.
आरोग्य व्यवस्था व दळण वळणाचा अभाव आजही ज्या तालुक्याने राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी व समृद्धी मार्गासाठी जागा दिल्यात त्यांना आजही आभागीप्रमाणे जीवन कंठावे लागत आहे. आजही दळणवळणाचा अभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
तालुक्यात आजही अनेक वाड्या-वस्त्या व दुर्गम भागात आरोग्य व्यवस्था आणि दळणवळणाच्या साधनांचा अभाव असून, अनेकवेळा गरोदर महिलांचे असे हाल झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
प्रशासनाची अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे अशा घटनांमधून वारंवार दिसून येत आहे. जुनानवणे वस्तीवरील महिलेला व त्यांच्या कुटुंबियांना रुग्णलयात जाण्यासाठी साडे तीन किलोमीटरची डोलीतून भर पावसात पायापीट करावी लागली.
प्रसूतीच्या असह्यकळा ती कशी बसी सहन करीत असतांना रस्त्याअभावी सदर महिलेची तब्येत अधिक खालावली व अधिक धोकादायक स्तिथीत शारीरिक परिस्थिती गेल्याने घोटी येथे आणून नाशिक जिल्हा रुग्णालय येथे नेतांना अर्ध्या रस्त्यावरच महिलेची व अभर्काची प्राणज्योत मालावली.
देशाचा ७५ वे अमृतमोहात्सव साजरा होत असताना आदिवासी पाडे आणि दुर्गम भागात मूलभूत सोयीसुविधा पोहोचलेल्याच नसल्याचं चित्र भयानक आहे.
“आम्हाला आता आत्मकलेश केल्याशिवाय पर्याय नाही. किती बिकट परिस्थिती आदिवासीच्या वाट्याला येतेय हे सत्ताधारी लोकप्रतिनिधिनी आदिवासी भागातील निधीला कात्री लावतांना पोटच्या पोराचा विचार डोळ्यासमोर आणावा. ” – सीताराम गावंडा, कार्यध्यक्ष, राया ठाकर फाउंडेशन महाराष्ट्र