नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरामध्ये काही दिवसांपासून वाहनांची तोडफोडी होण्याच्या घटना घडत आहेत काल रात्री अनेक दुचाकी आणि चारचाकी गाड्या जाळण्यात आल्यानंतर नाशिकरोड परिसरात पुन्हा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये २४ तासांत दुसऱ्यांदा तोडफोडीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तसेच शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर देकील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
१२ जुलै रोजी सिडको भागात देखील १६ गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ झाली. त्यानंतर विहितगाव येथे देखील गाड्या फोडण्यात आल्या. यानंतर आता पुन्हा एकदा नाशिक रोड परिसरात ४ ते ५ वाहनांची तलवारी आणि कोयत्याने काचा फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
टवाळखोरांकडून दहशत माजविण्यासाठी वाहनांची तोडफोड केली जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र यामुळे नाशिक शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. पोलिस प्रशासनाने या गंभीर प्रकाराचा सोक्षमोक्ष लावावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
काल रात्रीच्या घटनेत स्थानिक नागरिकांनी पोलिसांशी संपर्क केल्याचे सांगितले. ‘रात्री आम्ही पोलिसांना गावगुंड कुठून जाताय, हे सांगत होतो, मात्र पोलिसांनी लक्ष दिले नाही.’ कोयते, तलवारी घेऊन 8 ते 9 जण दुचाकीवरुन धुडगूस घालत होते. याबाबत आम्ही पोलिसांना सांगितले की, गुंडाचा पाठलाग करा म्हणून, मात्र आमच्या वाहनांची क्लजप्लेट खराब असल्याचे गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी सांगितल्याची माहिती नागरिकांनी दिली. अखेर काही स्थानिकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र गुंडांनी पकडण्यात स्थानिकांनी अपयश आले.