आधार अपडेटच्या नावाने नाशिककरांचा घात; फिंगर स्कॅनरद्वारे मोठा झोल, तिघांना अटक…

नाशिक (प्रतिनिधी): आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आयोजित केलेल्या शिबिरात नागरिकांच्या बोटांच्या ठशांचा डेटा (माहिती) संकलित करून संबंधितांच्या बँकेतून पैसे काढल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी तिघांना नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

संशयितांनी अडीच लाखांपेक्षा जास्त रकमेची लूट केली आहे. या ‘ठशांच्या’ माध्यमातून मिळालेल्या पैशांचा केवळ मौजेसाठी वापर करून दोन दुचाकी खरेदीसाठी ‘डाउन पेमेंट’ करीत महाविद्यालयाची फी भरल्याचे तपासात पुढे येत आहे.

नांदगाव तालुक्यातील पळाशी येथील पंधरा नागरिकांच्या बँक खात्यातून ई-स्वरुपात परस्पर ठराविक रक्कम इतर खात्यात वळती झाली.

एकूण २ लाख ६६ हजार ७९९ रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल होता. या प्रकरणी किशोर लक्ष्मण सोनवणे (वय २१), रवींद्र विजय गोपाळ (वय २३) आणि सोमनाथ काकासाहेब भोंगाळ (वय २३, सर्व रा. चाळीसगाव) या संशयितांना अटक करण्यात आली.

याप्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिले. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सत्यजित आमले यांनी पथकांना निर्देश दिले. त्यानुसार सहायक निरीक्षक सुनील पाटील, सारिका चौधरी, उपनिरीक्षक दीपक देसले, अंमलदार बिपीन चौधरी, प्रमोद जाधव, परिक्षित निकम, डी. बी. बागूल, नितीन करंडे, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयितांचा माग काढून त्यांना ताब्यात घेतले. तिघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

…असा आहे प्रकार:
संशयित रवींद्र आणि सोमनाथ यांनी जानेवारी २०२३ नांदगाव तालुक्यातील पळशी व वेहेळगावात ‘आधार’ अपडेशन शिबिर घेतले. बायोमॅट्रिक फिंगर स्कॅनरद्वारे नागरिकांच्या बोटांच्या अंगठ्यांचे ठशे घेतले. त्याच डेटाचा वापर करून ‘सीएसजी डिजी-पे ऑनलाइन मनी ट्रान्सफर्स सर्व्हिस अॅप’द्वारे संबंधित नागरिकांच्या बँक खात्यातून पैसे काढले.

तपासात काय?:

  • लॅपटॉप, मोबाइल, चार फिंगर स्कॅनर जप्त
  • शिबिरासह संशयितांच्या केंद्राला शासन मान्यता नाही
  • संशयित किशोर हा प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानांतर्गत परीक्षांची ई-नोंदणी करून देण्याचे काम करायचा
  • किशोर हा धुळ्यातील इंजिनीअरिंग महाविद्यालायत शिक्षण घेत आहे. त्याने लूटलेल्या पैश्यांतून कॉलेजची फी भरली
  • संशयितांनी दोन दुचाकींचे ‘डाउन पेमेंट’ केले.
  • अधीक्षकांतर्फे सायबर पथकाला १० हजारांचा ‘रिवॉर्ड’

“अनाधिकृतरीत्या नोंदणी करण्याच्या प्रयत्नातून हा प्रकार घडला. संशयितांनी खासगी मशिन्सचा वापर केला. नागरिकांनी शासनमान्य आधारसेवा केंद्रावरच नागरिकांनी अपडेटेशन करावे. जेणेकरुन फसवणुकीसह गैरव्यवहार टळतील.”- दीपक देसले, उपनिरीक्षक, सायबर गुन्हे ग्रामीण

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790