Breaking: नाशिक: समृद्धी महामार्गावर स्विफ्ट कारचा अपघात; दोघांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते शिर्डी टप्प्यात सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास स्विफ्ट कारचा अपघात झाला.

या अपघातात कारमधील दोघेजण गंभीर जखमी झाल्याने मृत्युमुखी पडले. हे दोघेजण अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.

श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेले आरोग्य कर्मचारी श्रीकांत थोरात हे चालक हर्षल भोसले यांच्यासोबत स्विफ्ट डिझायर कार क्र.एम एच-१४ ई वाय- ७१९८ मधून इगतपुरी येथील भरवीर इंटरचेंज वरून समृद्धी महामार्गावर शिर्डीच्या दिशेने जात होते.

गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास कार अपघातग्रस्त झाली. तीन ते चार पलट्या खात ही कार दुभाजकाच्या साईड बॅरिकेट्सला धडकून दोन्ही लेनच्या मधोमध जाऊन पडली.

किलोमीटर क्रमांक ५६० वर हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळाल्यावर गोंदे इंटरचेंज येथील महामार्ग सुरक्षा पथकाचे मदत पथक तातडीने अपघात स्थळी रवाना झाले.

अपघाताची माहिती समजल्यावर वावी पोलीस ठाण्यातील कर्मचारी शैलेश शेलार, देविदास माळी हेदेखील अपघातस्थळी पोहोचले.

कारमधील दोघा जखमींना मोठ्या बाहेर काढत टोल नाक्यावरील रुग्णवाहिकेतून सिन्नर ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तेथे पोहोचणे पूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान पोलिसांना अपघात ग्रस्त कारमध्ये एक लाख साठ हजार रुपये रोकड आढळून आली. ही रक्कम ताब्यात घेतल्याचे वावी पोलीस ठाण्यातील कर्मचारी शैलेश शेलार यांनी सांगितले. ही रक्कम थोरात की भोसले यांची होती याबाबत खातरजमा करून घेतल्यावर ती संबंधितांच्या नातेवाईकांकडे देण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here