नाशिक (प्रतिनिधी): स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर केल्यानंतर महापालिकेने केलेल्या पडताळणीत २४० होर्डिंगमध्ये दुरुस्ती आवश्यक असल्याचा अहवाल सादर झाला असून, सहा जाहिरात होर्डिंग धोकादायक स्थितीमध्ये असल्याने तातडीने हटविण्याच्या सूचना महापालिकेकडून संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
त्यासाठी होर्डिंग धारकांना २४ तासाची नोटीसदेखील बजाविण्यात आली आहे.
पिंपरी- चिंचवड महापालिका हद्दीमध्ये जाहिरात होर्डिंग कोसळून पाच जणांचा नाहक बळी गेला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महापालिका हद्दीतील जाहिरात होर्डिंगचे स्टॅबिलिटी सर्टिफिकेट तपासण्याच्या सूचना दिल्या होत्या.
नाशिक महापालिका हद्दीमध्ये ८४५ जाहिरात होर्डिंग धारक आहे. त्या सर्वांना २५ जूनपर्यंत जाहिरात होर्डिंग स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. होर्डिंग्जच्या स्टॅबिलिटी तपासणीकरिता सिव्हिल टेक, संदीप फाउंडेशन (त्र्यंबक रोड) आणि केबीटी महाविद्यालय, गंगापूर रोड या तीन एजन्सीची नियुक्ती करण्यात आली होती.
महापालिकेच्या विविध कर विभागाकडे ८४५ होर्डिंगधारकांनी प्रमाणपत्र सादर केले. त्यानंतर महापालिकेकडे होर्डिंगच्या दुरुस्ती तसेच अन्य तांत्रिक बाबीं संदर्भात माहिती मागविण्यात आली होती.
सिव्हिल टेक संस्थेने ४२४ होर्डिंगचा अहवाल महापालिकेला सादर केला. त्यात २४० होर्डिंगची तातडीने दुरुस्ती गरजेची असल्याचे शिफारस करण्यात आले आहे, तर सहा होर्डिंग अतिधोकादायक असल्याचा अहवाल सादर करण्यात आला असून, २४ तासात अति धोकादायक होर्डिंग पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अशी माहिती विविध कर विभागाचे उपायुक्त श्रीकांत पवार यांनी दिले. त्यानुसार कर विभागाने २४० होर्डिंग धारकांना दुरुस्तीची, तर ६ होर्डिंग धारकांना २४ तासात होर्डिंग पाडून टाकण्याची नोटीस बजावली आहे.
यात नाशिक पश्चिम विभागातील ४ ,नाशिक रोड विभागातील एक, तर सिडको विभागातील एका होर्डिंगचा समावेश आहे.