मोठी घटना! पोलिसांच्या वाहनावर झाड कोसळलं, पोलीस अधिकाऱ्यासह चालक जागीच ठार, तिघे जखमी

नाशिक (प्रतिनिधी): २९ जून गुरुवार रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल-कासोदाकडे जात असताना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या गाडीवर झाड कोसळल्याची घटना घडली. त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह चालकांचा देखिल मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

या अपघातात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन दातीर (रा.अंबड गाव, नाशिक) व चालक अजय चौधरी हे दोन्ही जागेवरच ठार झाले. तर चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. स्थानिकांच्या मदतीने जखमी पोलिसांना बाहेर काढण्यात आले. अंजनी धरणालगत ही दुर्घटना घडली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचे हे पथक पिलखोड येथील एका प्रकरणी तपासासाठी जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मयत एपीआय सुदर्शन दातीर हे अंबड येथील रहिवासी असून त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली. रात्री अनेक गांवकरी वाहनाने जळगावकडे रवाना झाले. दातीर यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व एक लहान मुलगा असा परिवार आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा ते पोलीस अधिकारी अशी ओळख तयार केलेल्या दातीर यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790