नाशिक (प्रतिनिधी): महिला बाउन्सरच्या मदतीने विवाहितेचे अपहरण केल्याचा प्रकार मंगळवारी (ता.२७) घडला. विवाहितेचा पती वैभव लाड यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात सासू, सासरे आणि बाऊन्सर यांच्याविरुद्ध अपहरण आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव लाड यांचा राजश्री ऊर्फ प्रिया लाड यांच्याशी ४ नोव्हेंबर २०२२ रोजी धार्मिक पद्धतीने प्रेमविवाह केला आहे. लग्नास विवाहितेच्या घरातील लोकांचा सुरवातीस विरोध होता. त्यानंतर विवाह झाल्यानंतर विवाहितेचे मामा उमाकांत वाघ, मामी देवयानी वाघ तसेच भाऊ राज शिरसाळे असे अधूनमधून घरी भेटण्यास येत होते.
दरम्यान विवाहितेचे आईवडील तक्रारदाराच्या आईच्या मोबाईलवर फोन करून तीस घरी परत येण्यासाठी तगादा लावत होते. तिने पती वैभव यांना याबाबत माहिती दिली होती. एकटी माझे माहेरी गेली तर माझे वडील हे माझे जिवाचे बरेवाईट करतील, अशी भीती व्यक्त केली होती.
त्यामुळे तक्रारदार यांनी पत्नीस कधीही एकटी जाऊ दिले नाही. मंगळवारी (ता.२७) सकाळी साडेअकराच्या सुमारास विवाहितेची आई मनिषा शिरसाळे तक्रारदार यांच्या घरी आल्या. त्यांच्या पाठोपाठ काही वेळाने काही अनोळखी महिला- पुरुषांनी (बाऊन्सर) यांनी घरात प्रवेश केला.
त्यातील एकाने तक्रारदार यांच्याशी झटापट करून मारहाण करत जातिवाचक शिवीगाळ केली. त्यात तक्रारदार जखमी झाले. त्यानंतर विवाहितेस जबरदस्तीने घरातून बाहेर घेवुन गेले. चारचाकीत बळजबरी बसविले व घेऊन गेले.
तक्रारदाराने त्रिकोणी गार्डन पोलिस चौकी येथे जाऊन पोलीसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच चारचाकी (एमएच- १५- डीएस- ७१०८) पाठलाग करून पौर्णिमा बस स्टॉप द्वारका येथे अडविली. पोलिसांनी चौकशी करत चारचाकीसह त्यात बसलेल्यांना ताब्यात घेतले.
चौकशीअंती रात्री उशिरा वैभव यांच्या तक्रारीवरून सासू मनिषा शिवाजी शिरसाळे, सासरे शिवाजी शिरसाळे तसेच त्यांच्या सोबत चारचाकीत असलेले किरण मधुकर आगळे (रा. पळसे), वैशाली सागर अहिरे (रा. पंचवटी), पूजा विष्णू धुमाळ (रा. नांदूरनाका), मंगला नीलेश सानप (रा. एकलहरे रोड), जागृती कुणाल पाटील (रा. म्हसरुळ),
नंदिनी गणेश धुमाळ (रा. पंचवटी), सारिका गंगेश भावसार (रा. हिरावाडी), पुनम गणेश साळुंके (रा. खडकाळी), समाधान आगळे (रा. जुना साखर कारखाना रोड) व चारचाकीमधील दोन ते तीन अनोळखी यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ अधिक तपास करत आहे.