नाशिक (प्रतिनिधी): शहरात द्वारका ते दत्त मंदिर दरम्यान प्रस्तावित दुमजली निओ मेट्रो उड्डाणपूल आता सारडा सर्कल ते थेट नाशिकरोड रेल्वे स्थानकापर्यंत उभारण्याचा सुधारित प्रस्ताव महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने राज्य शासनाकडे नुकताच पाठविला आहे.
दोन मार्गिकांसह शहरात एकूण बत्तीस किलोमीटर मार्गावर निओ मेट्रो प्रस्तावित आहे. केंद्र शासनाचा हा पथदर्शी प्रकल्प असून तो झाल्यास पुढील वर्षानुवर्षे वाहतुकीची समस्या उद्भवणार नसल्याकडे लक्ष वेधले जात आहे.
या प्रस्तावासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी यापूर्वीच द्वारका-दत्त मंदिर या दरम्यानच्या सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे भारतमाला योजनेत वर्गीकरण करून घेतलेले आहे. परंतु दिवसेंदिवस शहराची झपाट्याने वाढत चाललेली लोकसंख्या पाहता द्वारका-दत्त मंदिर हा दुमजली उड्डाणपूल झाल्यास काही वर्षांनी पुन्हा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होवू शकतो.
यावर मात करण्यासाठी म्हणून सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची मागणी राज्य आणि केंद्र शासनाकडे काही महिन्यांपासून लावून धरण्यात आली आहे.
भविष्यात उद्भवणारी समस्या रोखण्यासाठी गरज:
नाशिकरोड ते पुणे या हायस्पीड लोहमार्गाचे काम लवकर सुरू होऊन येत्या काही वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. यातून नाशिकरोड, नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या वाहतुकीवर मात करण्यासाठी द्वारका-दत्त मंदिरऐवजी सारडा सर्कल ते थेट नाशिकरोड रेल्वे स्टेशनपर्यत दुमजली उड्डाणपूल असणे गरजेचे आहे. याचनुसार सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने राज्य शासनाकडे पाठविला आहे.