नाशिक (प्रतिनिधी): काही महिन्यांपासून शहरात ठिकठिकाणी सातत्याने सोनसाखळी खेचून नेण्याच्या घटना घडल्या. यामुळे महिला वर्गात कमालीची दहशत निर्माण झाली होती. दरम्यान, शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने चैनस्नॅचिंग करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला मनमाडमधून अटक केली आहे.
न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. चौकशीतून सहा गुन्ह्याची कबुली संशयित चैनस्नॅचरने दिली असून आणखीही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.
अदनान युनूस पठाण (२२, रा. लासलगाव, ता. निफाड) असे गजाआड केलेल्या संशयित चैनस्नॅचर्सचे नाव आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने राहुल बाबू खरे या चैनस्नॅचर्सला अटक केली असता, चौकशीतून तो संशयित अदनान याच्यासोबत चैनस्नॅचिंग करीत असल्याची माहिती दिली होती.
त्याचा शोध काही दिवसांपासून गुन्हे शाखा करीत होते. परंतु संशयित अदनान सातत्याने राहण्याचे ठिकाणी आणि मोबाईल क्रमांक बदलत असल्याने तो पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी होत होता.
दरम्यान, बुधवारी (ता. १४) संशयित अदनान मनमाडमध्ये असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच, युनिट एकचे निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकाने मनमाडमध्ये सापळा रचून अदनान यास अटक केली.
चौकशीतून उपनगर हद्दीतील चार गुन्ह्यासह शहरातील दोन अशा सहा चैनस्नॅचिंगच्या गुन्ह्यांची कबुली अदनान याने दिली आहे. तसेच, त्याच्याविरुद्ध मालेगावात सटाणा नाक्यावरील सराफाकडे खंडणी मागितल्याचाही गुन्हा छावणी पोलिस ठाण्यात दाखल असून, त्याचीही कबुली त्याने दिली आहे.
अधिक तपासासाठी त्यास उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सदर कामगिरी युनिट एकचे निरीक्षक विजय ढमाळ, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, हवालदार प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, मुक्तार शेख, समाधान पवार यांच्या पथकाने बजावली.