नाशिक (प्रतिनिधी): समृद्धीच्या शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्यातील महामार्गावर वाहनांना दररोज अपघात होत आहेत. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास शिर्डीहून मुंबईकडे जाणाऱ्या इनोव्हा कारचे टायर फुटून कार रस्त्याच्या कडेला उलटली.
या अपघातात चौघेजण किरकोळ जखमी झाले असले तरी इनोव्हा कार पलट्या खात विरुद्ध बाजूच्या मार्गिकेवर जाऊन पडली. सुदैवाने तिकडून एखादे वाहन जात नसल्याने अनर्थ टळाला.
वावी पोलिस ठाण्याच्या हद्दीत किलोमीटर क्रमांक ५६४ वर हा अपघात झाला. शिर्डीहून मुंबईकडे जाणारी इनोव्हा (एमएच ०३, ए आर ३८८८) चे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. कार डिव्हायडरवर आदळून थेट विरुद्ध बाजूने जाणाऱ्या लेनवर जाऊन पलटी झाली.
यात चालक सुरेश सपकाळ, जय शाह, मनिथा शाह, नयना शाह हे किरकोळ जखमी झाले. त्यांना समृद्धी महामार्गावरील मदत पथकाने रुग्णवाहिकेतून सिन्नरला नेले.
महामार्ग पोलिस उपनिरीक्षक सुनील गायकवाड, पोलिस हवालदार धकाते, हेमंत मोरे, हरीश पवार, राहुल पगारे, समाधान शिंदे, मनोज कोटकर, मनोज साबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला घेऊन वाहतूक सुरळीत केली.
वेगामुळे थेट विरुद्ध मार्गिकेवर:
दोन दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील प्रवाशांची कार टायर फुटून अपघातग्रस्त झाली होती. त्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता. भरधाव असणारी ही कार देखील थेट विरुद्ध मार्गिकवर जाऊन पडली होती.
समृद्धीवर वाहनांचा वेग सुसाट असल्याने व ती आतल्या लेनमधून धावत असल्याने अपघातग्रस्त झाल्यावर थेट विरुद्ध बाजूच्या मार्गिकेवर जातात. भविष्यात अशा प्रकारच्या अपघातांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरणार आहे.