नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): लासलगाव येथील ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी तोडून तेथून पळ काढला होता. मात्र या घटनेची खबर पोलिसांना लागतात पोलिसांनी तात्काळ परिसरामध्ये नाकाबंदी करत पुढील तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यानंतर नाकाबंदी केली. त्यामुळे चोरट्यांनी तोडून नेलेले एटीएम रस्त्यावर फेकत पळ काढला.
लासलगाव येथील विंचूर रोडवरील अॅक्सिस बँकेजवळील एटीएम मशिनमधील सुमारे 14 लाख 89 हजार 400 रुपये रोख रक्कम शिल्लक असलेले एटीएम मशीन चौघा चोरट्यांनी आज पहाटे चार वाजेच्या सुमारास चोरून नेण्याचा प्रयत्न केला.
मात्र लासलगाव पोलिसांची जीप पाठलाग करत असल्याचे पाहून या चोरांनी मारुती एर्टिगा या सफेद रंगाच्या गाडीतून मशीन फेकून पलायन केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील विंचूर रोडवर अॅक्सिस बँकेची शाखा आहे. या शाखेजवळ ए.टी.एम. मशीनची तपासणी पहाटे तीन वाजता एस. आय.नंदकुमार देवढे, देवा पानसरे आणि होमगार्ड डी. के.पगारे यांनी केली आणि ते लासलगाव येथे गस्तीस गेले.
यांनतर पावणे चार वाजेच्या सुमारास या अॅक्सिस बँक एटीएममध्ये साडेतीन वाजेच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला आणि मशीनला फाउंडेशन नसल्याने अवघ्या पंधरा मिनिटांत मशीन हलवले आणि सोबत आणलेल्या चार चाकी वाहनातून एर्टिगा (क्रमांक एम. एच. 15 ए. झेड. 057) या वाहनात मशीन टाकून चार वाजून अकरा मिनिटांच्या सुमारास पलायन केले. एटीएम सुरक्षा यंत्रणेकडून या घटनेची माहिती लासलगाव शाखा व्यवस्थापक दिलीप शिंदे यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने ही माहिती लासलगाव पोलीस ठाण्यास कळवली.
अवघ्या पाच मिनिटांत लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार देवडे, प्रदीप आजगे, कैलास महाजन, पोलीस हवालदार देवा पानसरे, सुजय बारगळ,योगेश शिंदे, होमगार्ड डी.के. पगारे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांनी एटीएम मशीन घेऊन विंचूरकडे पलयान केल्याचे दिसून आले. पोलिसांनी विंचूरकडे वेगाने येऊन तेथील सीसीटीव्ही बघितला असता चोरटे निफाडच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. त्यामुळे लासलगाव पोलिसांचे पथक एमआयडीसी आवाराकडे चोरांच्या शोेधार्थ जाऊन आले.
त्यानंतर निफाडच्या दिशेने गाडी जात असताना पाठलाग सुरू केला. पोलिसांची गाडी पाहून या घाबरलेल्या चोरट्यांनी डिकीत ठेवलेले एटीएम मशीन वाहनाला ब्रेक मारून खाली पाडले आणि पलायन केले. यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. परंतु चोरटे पसार झाले.
मात्र एटीएम मशीनमधील कोणतीही रोख रक्कम चोरट्यांना चोरी करता आली नाही. पोलिसांनी तातडीने मशीनची तपासणी करून लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्याशी संपर्क साधून तातडीने नाकाबंदी केली. यानंतर मालेगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, नाशिकचे पोलीस उपाधीक्षक सुरेश भामरे तातडीने लासलगावी दाखल झाले व त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांनीही भेट दिली. लासलगाव अॅक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक दिलीप शिंदे हे देखील घटनास्थळी उपस्थित होते.