राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी पक्षाच्या निवड समितीची बैठक पार पडली. पक्षाचे वरिष्ठ नेते या बैठकीसाठी उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांचा राजीनामा फेटाळण्यात आला आहे. सर्वांच्या संमतीने राजीनामा नामंजूर करण्याचा ठराव संमत करण्यात आला.
शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी कार्यकर्ते आणि नेते करत आहेत. आता समितीच्या बैठकीत झालेला निर्णय शरद पवार यांना कळवला जाईल. पण अंतिम निर्णय पुन्हा घेण्याचा अधिकार शरद पवार यांना असेल. समितीमध्ये राजीनाम्यावरून दोन गट तयार झालेत. यात अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या निर्णयाचा मान ठेवणार असल्याचं म्हटलंय. अजित पवार यांचा विरोधी सूर कायम आहे.
शरद पवार यांच्या राजीनाम्यावर आजही तोडगा निघणार नसल्याची माहिती नेत्यांनी दिली आहे. तर यावर पुन्हा बैठक कधी याचीही आजच चर्चा होणार आहे. तर बैठकीतील मुद्यांवर चर्चा सुरू असून त्याचा अहवाल शरद पवार यांना पाठवला जाणार आहे. नवीन अध्यक्ष किंवा कार्याध्यक्ष नेमावा का याबाबत शरद पवार यांनीच भूमिका जाहीर करण्यावर समितीत चर्चा झाली. तर दुसऱ्या बाजुला समितीत मत मतांतरे असल्याचंही म्हटलं जात आहे.