नाशिक (प्रतिनिधी): शेअर्स घोटाळाप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्लू) या गुन्ह्यातील सहा एजंट्सना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या एजंट्सच्या बँक खात्यांवर संचालकांच्या बँकेतील रकमेपेक्षा अधिक रक्कम असल्याची माहिती आहे. काही एजंट फसवणुकीच्या रकमेतूनच कोट्यधीश झाले असून, त्यांच्या बँक व्यवहारांचा तपास सुरू झाला आहे.
👉 नाशिक: रविवार कारंजावरील चांदीच्या गणपती मंदिरात दागिन्यांची चोरी, काही तासांत आरोपी ताब्यात
काय आहे प्रकरण?:
कंपनीच्या दोन संचालकांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांना शेअर्स घोटाळ्याच्या कसून चौकशीच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार नंदकुमार निवृत्ती वाघचौरे (वय ३८), भाऊसाहेब बाबूलाल पाटील (३५), प्रशांत रामदास पाटणकर (३४), वैभव विजय ननावरे (२६), साईनाथ केशव त्रिपाठी (२४) आणि ज्ञानेश्वर रामकृष्ण वाघ (४१) या संशयितांना ‘ईओडब्लू’ने अटक केली आहे.
👉 डिग्री पूर्ण करा, 90 दिवसांची शिक्षेत सूट मिळवा, नाशिकरोड कारागृहात अनोखा शिक्षण उपक्रम
यापूर्वी कंपनीचे संचालक अविनाश विनोद सूर्यवंशी (रा. लासगाव) आणि अमोल कैलास शेजवळ (शिर्डी) यांना अटक केली होती. हे दोघे सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहेत. सहा एजंट्स नाशिकमधील रहिवासी असून, त्यांच्या बँक खात्यांत ५० लाख रुपयांपासून तीन कोटी ७६ लाखांपर्यंतची रक्कम आहे. त्यांच्या बँक खात्यांची माहिती गुन्हे शोध पथकाने संकलित केली असून, सहा संशयितांना चार दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणात शेकडो नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आतापर्यंत संशयितांवर भद्रकाली व मुंबई नाका पोलिसांत ठकबाजीचे दोन गुन्हे दाखल आहेत.
“कंपनीचे संचालक, एजंट्सच्या बँक व्यवहारांसह इतर आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे. तक्रारदारांची संख्या ५२ पर्यंत पोहोचली आहे. फसवणुकीच्या आकड्यानुसार गुंतवणूकदार अधिक आहेत. त्यांनी ‘ईओडब्लू’ कक्षात लेखी तक्रार सादर करणे अपेक्षित आहे.”-अशोक शरमाळे, पोलिस निरीक्षक, ईओडब्लू