अभिमानास्पद! सिन्नरच्या देवपूर गावातली पहिली मुलगी झाली डॉक्टर; गावकऱ्यांनी पंचक्रोशीत वाटले पेढे
नाशिक (प्रतिनिधी): सिन्नर तालुक्यातील देवपूर येथील सामान्य कुटुंबातील असलेल्या ज्योती सोमनाथ पन्हाळे हिने गावातील पहिली एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिने हे यश मिळवले असून नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दुसऱ्या क्रमांकाचे उत्तीर्ण होतो स्वप्नपूर्ती केली आहे.
सिन्नर तालुक्यासाठी अभिमानास्पद गोष्ट घडली असून तालुक्यातील देवपूर येथील ज्योती पन्हाळे ही पहिली मुलगी गावातून डॉक्टर झाली आहे. शेतीत काम करून आपल्या कुटुंबाची उपजिविका भागवणाऱ्या शेतमजूर कुटुंबात जन्मलेल्या ज्योतीने कुटुंबासह ग्रामस्थांची मान उंचावली असून पहिली एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान ज्योतीने मिळवला आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील देवपूर येथील ज्योती सोमनाथ पन्हाळे हिने एमबीबीएसच्या अंतिम परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन देवपूर गावातून पहिली एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे.
अवर्षणग्रस्त सिन्नर तालुक्यात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणारे माजी आमदार सूर्यभान गडाख यांचे गाव असलेल्या देवपूर येथील कन्येने नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात द्वितीय क्रमांक मिळवून देवपूर गावाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा खोवला आहे.
डॉ. ज्योती पन्हाळे या देवपूर हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी असून इयत्ता दहावी पर्यंत त्यांनी देवपूर हायस्कूल येथे शिक्षण केले आहे. ग्रामीण भागात शिक्षण घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवल्यानंतर डॉ. ज्योती पन्हाळे यांनी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर सदर यश संपादन केले.
देवपूर गावात पहिली एमबीबीएस त्यात महिला एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान मिळवल्याबद्दल डॉ. ज्योती पन्हाळे यांचे कौतुक केले जात आहे. शेतकरी कुटुंबातील असणारे ज्योती यांचे वडील सोमनाथ पन्हाळे यांचे गहू हार्वेस्टिंग मशीन असून सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. दहावीपर्यंत माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या देवपूर हायस्कूल मध्ये शिक्षण वडील सोमनाथ पन्हाळे यांनी मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक ओढाताण असतांना शिक्षण पूर्ण केले. डॉ ज्योती घरातील मोठी मुलगी असून लहान बहीण व लहान भावाचे शिक्षण सुरू आहे.
गावात अनेक ज्योती घडवणार…:
गावातील पहिली मुलगी एमबीबीएस झाल्याबद्दल आम्हाला ज्योतीचा सार्थ अभिमान आहे. तिचा आदर्श घेऊन येणाऱ्या काळात गावात आणखी ज्योती तयार होतील. ज्योतीने मिळवलेले यश युवा पिढीला नक्कीच प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास ज्योतीच्या आईवडिलांनी व्यक्त केला. ज्योतीचे यश गावच्या प्रत्येक मुलाला प्रेरणा देणारे ठरणार असून ती यापुढेही आपल्या क्षेत्रात नक्कीच उंच भरारी घेईल यात कोणतीच शंका नाही. ज्योतीच्या या दैदिप्यमान यशात तीच्या कुटुंबीयांचा देखील मोलाचा वाटा असून शिक्षकांचे तिला नेहमीच मार्गदर्शन लाभले असल्याचे गावातील जेष्ठ नागरिकांनी सांगितले. डॉ. उत्कर्षा ही गावातील पहिली मुलगी एमबीबीएस झाल्यामुळे गावासह परिसरातून तिचे कौतुक होत आहे.