नाशिक: गुन्हेगारी वाढली.. फेसबुक पोस्टच्या वादातून तरुणाचा खून !

नाशिक: गुन्हेगारी वाढली.. फेसबुक पोस्टच्या वादातून तरुणाचा खून !

नाशिक (प्रतिनिधी): सातपूर गावातील गोरक्षनाथ रोड मळे परिसरातील काश्मिरे व सोनवणे यांच्या मळ्यातील चाळीत राहणार्‍या परप्रांतीय तरुणांमध्ये काल रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास फेसबुक पोस्टवरून वाद झाला.

या कारणातून संतोष जयस्वाल या तरुणाचा खून झाल्याची घटना घडली. मारेकर्‍याने पळ काढला असून, पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला आहे.

संतोष जयस्वाल (वय ३०, मूळ गाव आझमगड, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या युवकांचे नाव असून, तो गॅरेजचे काम करीत होता. सोनवणे चाळीतील रामकिशन निषाद व त्यांच्या साथीदारांसोबत फेसबुक पोस्टवरून वाद झाला.

हे ही वाचा:  नाशिक: कुंभमेळ्यातील गर्दी नियोजनासाठी सूक्ष्म नियोजन करावे- अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल

त्या कारणावरून युवकास लोखंडी रॉडने डोक्यात गंभीर मारहाण केली. यात जखमी झालेल्या संतोष जयस्वाल याला त्याच्या नातेवाईकांनी सातपूरमधील खासगी, तसेच ईएसआय रुग्णालयात उपचारासाठी नेले होते; मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने जखमी संतोष जयस्वालची तपासणी केली असता त्याला मृत घोषित करण्यात आले, या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांची सर्व पथके तत्काळ घटनास्थळी पोहोचली. दरम्यान, संतोष जयस्वाल मयत झाल्याचे समजताच मारहाण करणारा संशयित रामकिशन निषाद व त्याचे अन्य साथीदार फरारी झाले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: पोलिस आयुक्त आपल्या दारी; तक्रारींचे आवाहन

पोलीस प्रशासन संशयितांचा शोध घेत असून, त्यांच्या मागावर आहेत, फेसबुकवर फोटो पोस्ट केल्यानंतर संशयिताने हसल्याची कमेंट टाकली होती, यावरून दोघांचे वाद असल्याचे समजते, सातपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: डॉमिनोज पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये तोडफोड करणाऱ्या तिघांना अटक !

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने परिमंडळ दोनच पोलीस उपायुक्‍त चंद्रकांत खंडवी, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्‍त बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्‍त सोहेल शेख, सहाय्यक पोलीस आयुक्‍त वसंत मोरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सावंत, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुदगल वाघ व त्यांचे कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आणि तातडीने आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790