नाशिक: ‘ह्या’ कारणामुळे सिडकोत बापानेच केला मुलीचा खून!
नाशिक (प्रतिनिधी): कधी कधी एखाद्या किरकोळ बाचाबाचीचं पर्यावसान गंभीर गुन्ह्यात होऊ शकतं.
असाच एक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे.
बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फसणारा प्रकार सिडको परिसरातील अंबड लिंक रोड चुंचाळे शिवारातील रामकृष्ण नगर येथील शिव व्हीला अपार्टमेंट येथे घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की संशयित रामकिशोर भारती (वडील) (वय: ४५) व ज्योती भारती (वय: २४) हे घरी असताना त्यांच्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्यानंतर रामकिशोर भारती याचा राग अनावर झाल्याने त्याने त्याच्याच मुलीचा म्हणजेच ज्योतीचा घरातील ओढणीच्या सह्याने गळा आवळून खून केला.
याची माहिती अंबड पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटना स्थळ गाठून संशयित रामकिशोर भारती यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लग्नावरुन वाद, राहत्या घरी ओढणीने गळा आवळला:
नाशिकच्या अंबड लिंक रोडवरील चुंचाळे परिसरातील ही घटना घडली आहे. जन्मदात्या बापानेच ओढणीने गळा दाबून आपल्या मुलीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चुंचाळे परिसरातील रामकृष्ण नगर भागात रामकिशोर भारती यांचं कुटुंब राहते. त्याच्यासोबत त्याची मुलगी ज्योती ही पण राहते. काही दिवसांपासून राम किशोर आणि ज्योती या दोघांमध्ये ज्योतीच्या लग्नावरुन वाद सुरु होते. या वादातून ज्योती ही दोन वेळा घरातून निघून गेल्याचे समजते. काल देखील ज्योती हिने वडील राम किशोरला घरातून निघून जाण्याची धमकी दिली होती. याचा राग आल्याने रागाच्या भरात रामकिशोरने आपल्या राहत्या घरी मुलीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याचे प्राथमिक माहिती आहे..