सिन्नर-शिर्डी हायवेवर खासगी ट्रॅव्हल बस आणि ट्रकचा भीषण अपघात; १० ठार तर १७ गंभीर जखमी
नाशिक (प्रतिनिधी): सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ खासगी ट्रॅव्हल बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला आहे.
बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की बस आणि ट्रक यांचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.
या भीषण अपघातात तब्बल १० जण ठार झाले आहेत. तर १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची चिन्हे आहेत.
सिन्नर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खाजगी ट्रॅव्हल बस (क्रमांक एम एच ०४ एसके 2751) मुंबई येथून शिर्डीकडे जात होती.

तर, माल ट्रक (क्रमांक एम एच 48 टी 12 95) शिर्डीहून सिन्नरकडे येत होता. बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. हा अपघात अतिशय भीषण होता. अपघातामुळे मोठा आवाज झाला. बसमध्ये प्रवासी झोपलेले होते. अचानक झालेल्या या अपघाताने प्रवाशांना जीव वाचविण्याचीही संधी मिळाली नाही.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस, अॅम्ब्युलन्स यांचा मोठा ताफा हजर झाला. तत्पूर्वी स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले होते.
अपघातामुळे पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाक्यादरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती. अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे ५० प्रवासी या बसमधून शिर्डीकडे प्रवास करत होते. उल्हासनगर येथील १५ प्रवासी असल्याचे समजते. मृतांची आणि जखमींची नावे कळण्यास उशीर लागेल असे पोलिसांचे म्हणणे आहे. गाईड ट्रॅव्हल्स या कंपनीची ही बस आहे. ३५ ते ४० प्रवासी उपचाराकरिता सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यात मृतांचा देखील समावेश आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790