नाशिक: ‘त्या’ युवकाविरुद्ध ‘मुहूर्त’ शोरूममधील माल चोरल्याचा गुन्हा दाखल
नाशिक (प्रतिनिधी): मुहूर्त या शोरूमच्या मालकाने विशाल वाहुलकर याला डांबून ठेवत बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आता या युवकावर शोरूममधील एकूण ५५ हजार रुपयांचा माल चोरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठक्कर डोम जवळ मुहूर्त नावाचे कपड्याचे शोरूम नव्याने सुरू झाले आहे. या शोरूममध्ये विशाल सुधाकर वाहुलकर (वय: २४) हा सेल्समन म्हणून काम करतो. 26 डिसेंबर रोजी या शोरूमचे मालक रितेश जैन व विनीत राजपाल यांनी दुकानातील 3 सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्याला शर्ट चोरल्याच्या संशयावरून डांबून ठेवत बेदम मारहाण केली, अशी तक्रार विशाल याने गंगापूर पोलीस ठाण्यात दिली होती.
आता विशाल याने शोरूम मधील एकूण ५५ हजार रुपयांचा माल चोरल्याची फिर्याद देण्यात आली आहे. विशाल याने या चोरीबाबत कबुली दिल्याचेही फिर्यादीत म्हंटले आहे. विशाल भोळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विशाल वाहुलकर याच्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ०२५७/२०२२) याबाबत अधिक तपास गंगापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बैसाणे करत आहेत.