कोरोना रिटर्न: नाशिकमध्ये ८०० बेड्स, ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था
नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे अद्याप गंभीर वातावरण नसलं तरी केंद्र सरकारच्या आदेशानुसार नाशिक महापालिकेने मात्र सज्ज होण्याची तयारी केली आहे.
नाशिक महापालिकेकडे ८०० खाटा असून, चारशे मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठ्याची क्षमता आहे.
याबाबतची माहिती आता केंद्र सरकारच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे.
चीन, अमेरिका, कोरिया आणि जपान अशा काही देशांमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूचे रुग्ण आढळल्यानंतर केंद्राने राज्य शासन आणि सर्वच स्थानिक स्वायत्त संस्थांना दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या शनिवारी शासकीय आरोग्य यंत्रणांची दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली.
यावेळी कोरोनाचा संसर्ग वाढल्यास काय सज्जता करण्यात आली आहे, याची माहिती अपलोड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नाशिकमध्ये काय तयारी आहे:
नाशिक महापालिकेने कोरोना रुग्णांसाठी कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय आणि नाशिकरोड येथील नवीन बिटको रुग्णालय राखीव ठेवले होते. याशिवाय सिडको, पंचवटी, सातपूर येथील कोविड सेंटर्सदेखील सुरु केले होते.
तूर्तास मात्र गंभीर परिस्थिती निर्माण झालीच तर आठशे बेड्स उपलब्ध होतील असे महापालिकेचे म्हणणे आहे. तसेच महापालिकेने दोन्ही रुग्णालये, तसेच खाजगी रुग्णालये मिळून चारशे मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता निर्माण केली असल्याचे प्रसासानाचे म्हणणे आहे. यासंदर्भातील माहिती मंगळवारी केंद्र सरकारच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे.
नाशिक महापालिकेने गेल्या दोन लाटांचा अनुभव पाहता, सर्व प्रकारची माहिती संकलित करणे सुरु केले आहे. तज्ञांच्या मतानुसार भारतात धोका नसला तरी सतर्क आणि सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने तयारी सुरु केली आहे.
कोवॅक्सीन 1800, कोविशिल्ड शून्य:
गेल्या काही महिन्यांपासून कोविशिल्ड लस उपलब्ध होत नसली तरी कोवॅक्सीनच्या १८ हजार मात्र उपलब्ध आहेत. शहरातील ३० केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील १५ लाखपैकी ८९.७८ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर ७९.७१ टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. १० टक्के नाशिककरांनी पहिला डोस आतापर्यंत घेतलेलाच नाही, तर २० टक्के नागरिकांनी अद्याप दुसरा डोस घेतला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.