नाशिक: नववर्षाच्या सुरवातीला सिटीलिंक बस दरात एवढी वाढ होणार! जाणुन घ्या…
नाशिक (प्रतिनिधी): महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीकडून जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहर बस वाहतुकीत सात टक्क्यांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्या संदर्भातील प्रस्ताव सिटीलिंक कंपनीकडून प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला सादर करण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी महापालिकेकडून शहर बससेवा सुरू करण्यात आली आहे.
शहर बस वाहतुकीच्या दरात भाडेवाढ करायची असेल तर त्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला प्रस्ताव सादर केला जातो. त्याअनुषंगाने महापालिकेने प्रस्ताव सादर केला आहे.
सिटीलिंक कंपनीच्या करारानुसार दरवर्षी पाच टक्के भाडेवाढ करणे आणि जानेवारी 2022 मध्ये पाच टक्के दरवाढ करण्यात आली होती.
या वर्षी डिझेल व सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने सिटीलिंक कंपनीचा तोटा भरून काढण्यासाठी सात टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तिकीट दर आकारताना सुट्ट्या पैशांचा तुटवडा निर्माण होत असल्याने तिकिटाचे दर आता पूर्णांकात आकारले जाणार आहे. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पासच्या दरातही वाढ केली जाणार आहे. नाशिक महानगर परिवहन महामंडळ कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत भाडे वाढीला मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीसाठी आता प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.