नाशिक: जमिनीच्या वादातून पुतण्यानेच केला काकाचा खून; पोलिस तपासात उघड
नाशिक (प्रतिनिधी): जमिनीच्या वादातून पुताण्यानेच काकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पिंपळकोठे(ता. बागलाण) येथील प्राथमिक शिक्षक रमेश शिवराम भामरे यांचा झालेला मृत्यू हा अपघाती नसून जमिनीच्या वादातून सख्या पुतण्यानेच त्यांचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याने बागलाण तालुक्यातील खळबळ उडाली आहे.
दरम्यान जायखेडा पोलिसांनी मुख्य आरोपी सुजित सुनील भामरे (वय- २९) याला अटक केली असून त्यानेच रमेश भामरे यांचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.
काल शनिवार (ता.१२)रोजी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने शिक्षक रमेश भामरे यांचा अपघाती मृत्यू झाल्याची जायखेडा पोलिसात नोंद झाली होती.मात्र हा अपघात नसून घातपात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्याने जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी याकडे लक्ष केंद्रित केले असता त्यांना घटनाक्रम संशयित असल्याचे वाटले.
त्यानंतर चौकशीत मयत रमेश भामरे यांचा पुतण्या सुजीत सुनील भामरे यानेच भामरे यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने धडक दिली. भामरे जखमी झाल्यानंतर त्यांच्या डोक्यावर हत्याराने वार करून त्यांचा खून केल्याचा अंदाज पारधीना आला.
दरम्यान परवा शुक्रवार (ता.१२)रोजी अपघात झाल्यानंतर जायखेडा पोलिसांना मागील अनेक वर्षांपासून मयत काका आणि पुतण्याचे वाद असल्याची माहिती मिळाली होती. मयत रमेश भामरे यांच्या शरीरावर असलेल्या जखमा देखील संशयास्पद असल्याचे पोलिसांना लक्षात आल्याने भामरे यांच्या अंतिम संस्काराच्या वेळी स्थानिक गुन्हे शाखेचे सहा पोलिस साध्या गणवेशात बारकाईने लक्ष ठेवून होते.
या सर्व घटनाक्रमात पोलिसांना मयत भामरे यांचा पुतण्या सुजीत सुनील भामरे याच्यावर दाट संशय आला. पोलिसांनी सुजीत भामरे याच्या मोबाइलची कॉल डिटेल्स तपासून अपघात घडल्यानंतर तो कोणाशी फोनवर बोलला याची सखोल चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे तपासात निष्पन्न झाले आहेत.
अपघात ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका शेतात अपघाताला कारणीभूत ठरलेले ट्रॅक्टर देखील मिळून आले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी सुजीत भामरे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसीखाक्या दाखविल्यानंतर सुजित पोपटासारखा बोलू लागला व त्यानेच काका रमेश भामरे यांना ट्रॅक्टरने धडक दिल्याचे त्या नंतर एका हत्याराच्या सहायाने त्यांचा खून केल्याची कबुली दिली आहे.