नाशिक: मुंबई नाका चौकात अंडरपास; शहरात 3 चौकात उड्डाणपूल
नाशिक (प्रतिनिधी): औरंगाबाद महामार्गावरील मिरची हॉटेल चौकातील अपघातानंतर शहरातील वाहतूक कोंडीचे नियोजन करण्यासाठी गुरुवारी (ता.१०) बोलविण्यात आलेल्या ट्रॅफिक सेलच्या बैठकीत मुंबई नाका व द्वारका चौक येथे वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी अंडरपास तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अंडरपासमधून वाहनांची ये-जा होणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात ट्रॅफिक सेलच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी ट्रॅफिक सेलची बैठक फक्त कागद रंगविण्यासाठी होत होती, मात्र औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल मिरची चौकात झालेल्या अपघातानंतर शहरातील संपूर्ण वाहतुकीचे नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
यानंतर शहर वाहतुकीच्या नियोजन संदर्भात बैठक झाली. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अविनाश देवरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे शशांक आडके, रेझिलीइंट इंडियाचे राजीव चौबे, अतिरिक्त आयुक्त अर्चना तांबे, प्रियांका लखोटे, उपायुक्त करुणा डहाळे, डॉ. विजयकुमार मुंडे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, नगर नियोजन विभागाचे उपसंचालक हर्षल बाविस्कर, के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रा. डॉ. विलास पाटील, शासकीय तंत्रनिकेतनचे प्रा. डॉ. रवींद्र सोनोने आदी उपस्थित होते.
प्रारंभी शहरातील चौकांमधील वाहतूक कोंडीचा आढावा घेण्यात आला. यात सद्यःस्थितीत मुंबई नाका चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्रीकरण दाखविण्यात आले. पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी मुंबई नाका सर्कलची व्याप्ती कमी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्याचबरोबर सार्वजनिक रस्त्यांवर दृश्य मानतेसाठी सूचना फलक व ठिकाणे रंग, डिझाईन निश्चित करणे, वाहतूक नियोजन व पेट्रोलिंगच्या दृष्टीने पोलिस चौकीची ठिकाणे, डिझाईन, मिरची चौकातील टेम्पलेट बदलण्याच्या सूचना केल्या.
वाहनांचा वेग तीस किलोमीटर प्रतितास असेल तर अपघातातील मृत्यूचे प्रमाण दहा टक्के असते. परंतु, साठ किलोमीटर प्रतितास वेग असेल तर मृत्यूचे प्रमाण ९५ टक्के असते. त्याचबरोबर विनाहेल्मेटमुळे ही मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याचे सादरीकरणात दर्शविण्यात आले. रेझिलीइंट कंपनीकडून अपघात स्थळांचे सर्वेक्षण करण्याबरोबरच उपाययोजना करण्यासंदर्भात पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रस्ताव शासनाकडे:
वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून औरंगाबाद महामार्गावरील मिरची चौक, नांदूर नाका तसेच सिद्धिविनायक चौक या तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
हेल्मेट न घातल्याने ४८ मृत्यू:
अपघातामुळे मृत्यूचा आढावा या वेळी घेण्यात आला. जानेवारी ते सप्टेंबर २०२२ या कालावधीपर्यंत वेगाने वाहन चालविल्याने १८६ अपघात झाले आहेत. एकूण अपघातामध्ये साठ जण मृत्युमुखी पडले असून, यातील ४८ मृत्यू हेल्मेट न घातल्याने झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ट्रॅफिक सेल बैठकीत झालेले महत्त्वाचे निर्णय:
गर्दीच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, मुंबई नाका व द्वारका चौकात अंडरपास, अपघाताच्या २३ ब्लॅकस्पॉटवर सिग्नल यंत्रणा, वाहतूक शाखेत स्वतंत्र उपायुक्त दर्जाचा अधिकारी, बंद पडलेले सात सिग्नल पुन्हा नव्याने सुरू होणार, महामार्गावरील पेट्रोलिंग साठी १६ जीप व १६ मोटरसायकल, ५० वाहतूक पोलिसांना मुंबईत प्रशिक्षण.