नाशिक: कपाटाची चावी बनवून देण्यास आला आणि हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला…
नाशिक (प्रतिनिधी): चावी बनवून देणाऱ्या इसमास घरात घेत असाल तर सावधान… चावी बनवून देण्याच्या बहाण्याने कपाटातील ऐवजच लंपास केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे…
घरातील लोखंडी कपाटाची चावी बनविणार्या अज्ञात इसमाने कपाटातील 66 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना सातपूर येथे घडली.
फिर्यादी ललिता बाळासाहेब अहिरे (रा. आठ हजार कॉलनी, सातपूर कॉलनी, सातपूर) यांच्या लोखंडी कपाटाची चावी काही दिवसांपासून सापडत नव्हती.
दुपारच्या सुमारास गल्लीतून “कुलूप दुरुस्त करून मिळेल, चावी बनवून मिळेल” असा आवाज देत जाणाऱ्यास अहिरे यांनी चावी बनवून देण्यास सांगितले.
या इसमाने कपाटाची चावी बनवीत असताना फिर्यादी अहिरे यांची नजर चुकवून कपाटात असलेली 25 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, 17 हजार 500 रुपये किमतीचे कानातील झुमके, साडेसात हजार रुपये किमतीचे कानातील वेलजोड, तसेच 16 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 66 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी चावी बनविणार्या अज्ञात इसमाविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार आहेर करीत आहेत.