नाशिक: रेल्वे नोकरीच्या आमिषाने चौघांची तब्बल 55 लाखांची फसवणूक
नाशिक (प्रतिनिधी): रेल्वेत सरकारी नोकरीच्या आमिषाने चार जणांकडून तब्बल सुमारे 55 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी संशयित भाऊसिंग साळुंखे, पत्नी मनीषा साळुंखे व मुलगी श्रुतिका साळुंखे यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत स्वप्नील राजेंद्र विसपुते (वय 30, रा. अंबिका पॅराडाईज, एकदंतनगर, अंबड) यांनी तक्रार नोंदविली आहे.
त्यानुसार सरकारी नोकरी लावून देतो, असे म्हणून साळुंखे कुटुंबीयांनी विसपुते यांच्याकडून रोख पाच लाख रुपये घेतले आणि बनावट वेबसाईट तयार करून त्याद्वारे स्वप्नील विसपुते यांचा बनावट रिझल्ट तयार करून त्यांची दिशाभूल केली.
नोकरी मिळत नाही, हे पाहून स्वप्नील विसपुते यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
यावेळी स्पष्ट झाले, की फिर्यादी स्वप्नील विसपुते यांच्याप्रमाणेच सोनाली पाटील यांच्याकडून 13 लाख 70 हजार रुपये, पंकज अर्जुन पवार यांच्याकडून 15 लाख रुपये, मनीषा विनोद सुरवाडे यांच्याकडून 10 लाख रुपये व शिवाजी नाना मंगळकर यांच्याकडून 11 लाख रुपये, अशी सुमारे 54 लाख 70 हजार रुपयांची रक्कम साळुंखे दाम्पत्याने जमा करून सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने त्यांची फसवणूक केली.
त्याचप्रमाणे आय. एन. ही बनावट वेबसाईट तयार करून त्यावर रेल्वेमध्ये सरकारी नोकरी लावून देण्याच्या दृष्टीने बनावट रिझल्ट दाखवून बोगस जॉईनिंग लेटर व बोगस मेडिकल रिपोर्ट देऊन वरील चारही जणांचा विश्वासघात व फसवणूक केली. या प्रकरणी फिर्यादी स्वप्नील विसपुते यांच्या तक्रारीवरून अंबड पोलिसांनी भा. दं. वि. कलम 420, 465, 467, 468, 471 व 34 या प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक शेख हे अधिक तपास करीत आहेत.