नाशिक: पुराच्या पाण्यात गाडी चालवणं पडलं महागात; महाविद्यालयीन तरूणीचा मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): पुराच्या पाण्यात गाडी चालवणं नाशिक जिल्ह्यातील एका मुलीच्या जिवावर बेतलं आहे.
पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने नाशिकमध्ये अकरावीमध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे.
ही घटना नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात घडली आहे.
काकासाहेब वाघ कनिष्ठ महाविद्यालयात सदर विद्यार्थिनी शिकत होती.
दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्यांना पूर आले आहेत. त्यामध्येच नाशिकमधील निफाड तालुक्यातील विंता नदीला मोठा पूर आला होता. यावेळी एक तरूणी कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती. विंता नदीला पूर आला असतानाही मुलीने पुराच्या पाण्यातून गाडी घालण्याचे धाडस केले पण पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली.
त्याचबरोबर पुढे गेल्यानंतर काही नागरिकांनी तिला पाण्याच्या बाहेर काढलं पण तोपर्यंच तिचा मृत्यू झाला होता. या प्रकारानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पुराच्या पाण्यात न जाण्याचे आवाहन केले असतानाही असं धाडस करणं कशा प्रकारे जिवावर बेतू शकतं याचं हे जिवंत उदाहरण आहे.