नाशिक: पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याच्या प्रयत्नात धावत्या रेल्वेतून उडी घेतली आणि जीव गमावला…
नाशिक (प्रतिनिधी): घरफोडीचा आरोप असलेल्या संशयित आरोपीने धावत्या रेल्वेतून उडी घेतली.
रेल्वेतून उडी मारल्यानंतर परप्रांतीय संशयित गंभीर जखमी झाला होता.
जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तबारक रयनी उर्फ चिन्हे (४० रा. ललिया जि.बलरामपूर,उत्तरप्रदेश) असे मृत संशयित चोरट्याचे नाव आहे. मुंबईतील कांदीवली पोलिस ठाणे हद्दीत त्याने घरफोडी केल्याच्या आरोपातून त्यास अटक करण्यात आली होती. सहाय्यक निरीक्षक सोहन कदम यांच्या नेतृत्वाखालील पथकातील हवालदार अनिल जैतापकर,शिपाई रविद्र राऊत व सुरेज केसरकर आदींचे पथक त्यास मुद्देमाल जप्तीसाठी त्याच्या उत्तरप्रदेशातील मुळ गावी घेवून जात होते.
पोलिसांची कैदी पार्टी पुष्पक एक्सप्रेस या रेल्वेने गुरूवारी (दि.२१) सांयकाळी उत्तर प्रदेशच्या दिशेने प्रवास करीत असतांना ही घटना घडली. मनमाड रेल्वेस्थानक येण्यास काही अंतर बाकी असतांनाच संशयिताने लघुशंकेचा बहाणा करून अंमलदार केसरकर यांच्या हाताला झटका देत धावत्या रेल्वेतून उडी घेतली होती.
पथकाने साखळी ओढत पसार होण्याच्या प्रयत्न करणा-या जखमी चिन्हे याचा पाठलाग करून ताब्यात घेतले. या घटनेत चिन्हे याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यास नजीकच्या मनमाड शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मध्यरात्री प्रथमोपचार करून त्यास नाशिक येथील जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतांना शुक्रवारी (दि.२२) त्याचा मृत्यू झाला. याबाबत सहाय्यक निरीक्षक सोहन कदम यांनी दिलेल्या खबरीवरून सरकारवाडा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास निरीक्षक चव्हाण करीत आहेत.